विशेष प्रतिनिधी
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जमिनीबाबत अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र तक्रार मिळाल्यानंतर चौकशी केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि त्याचा मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जागा 300 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या जागेची किंमत 1800 कोटी रुपये असल्याचा दावा केला जात असून खरेदीसाठी मुद्रांक शुल्कही भरलेला नाही. यावरून अजित पवार यांच्यावर आरोप होत आहेत. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, “दमानिया यांचा फोन आला होता. त्यांनी मंगळवारी अधिकृत तक्रार दाखल करण्याचे सांगितले आहे. तक्रार आल्यानंतर उद्योग विभाग तपास करेल की कोणत्या योजनेअंतर्गत आणि कोणत्या सवलतींचा लाभ घेतला गेला आहे. आयटी पार्क धोरणामध्ये कॅबिनेटने काही सवलती जाहीर केल्या होत्या. त्यात मुद्रांक माफीचा मुद्दा असल्यास त्याचीही चौकशी केली जाईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “माझ्याकडे तपासाचे अधिकार आहेत. नियमात जर स्पष्ट तरतूद असेल तर अधिकारी स्तरावर चौकशी केली जाईल. मला तक्रार मिळाल्यानंतर लगेच तपास सुरू केला जाईल.”
महायुतीतील संभाव्य मतभेदांबाबत विचारले असता बावनकुळे यांनी सांगितले की, “भाजपचे अध्यक्ष रवी चव्हाण यांनी ८० निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. यामध्ये नगर परिषद, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचे प्रभारी नेमले गेले आहेत. अर्ज भरण्यापासून उमेदवार निवडीपर्यंतची जबाबदारी या प्रमुखांवर आहे. तसेच त्या भागातील मंत्रीदेखील संबंधित जिल्ह्यांत प्रभारी म्हणून कार्य करतील.”
त्यांनी स्पष्ट केले की, “गणेश नाईक यांना महायुती संदर्भातील समन्वयाची जबाबदारी दिली आहे आणि ते त्या भूमिकेत पूर्ण जबाबदारीने कार्य करतील. काहीवेळा व्यक्तिगत पातळीवर चर्चा होत असली तरी अधिकृत जबाबदारी दिल्यानंतर ते संघटनेच्या भूमिकेनुसार काम करतील.”
कामठी विधानसभा क्षेत्रात दुबार मतदार असल्याचा आरोप झाल्यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले, “जर झोपेचे सोंग घेतले असेल तर मला माहिती नाही. कामठीत ६५ बूथ आहेत, तिथे काँग्रेसला ४०० मते आणि मला फक्त २ मते मिळाली. फडणवीस यांनी आधीच यासंदर्भात तक्रार केली होती. आता विरोधक त्याच गोष्टीचा राजकारण करत आहेत. माझ्या विरोधात लढलेले काँग्रेसचे उमेदवार स्वतःच दुबार मतदार असल्याचा प्रकार समोर आला आहे.”
दुबार मतदानाचा मुद्दा फक्त दिशाभूल करण्यासाठी वापरला जात आहे. मतदानावेळी शाई एकदाच लागते, त्यामुळे ही शक्यता तपासली जाऊ शकते. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावे. त्यांनी जर त्याबाबत ट्विट केले, तर मी त्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस देईन.”
regarding Parth Pawar’s land deal, clarifies Chandrashekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी


















