विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने 1800 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप झाला आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलावर जय पवारवर टँगो दारू कंपनीशी संबंधित भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हणाले की, अजित पवार स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी आणि तुरुंगवास टाळण्यासाठी भाजपात गेले आहेत. पण पक्ष बदलल्यानंतरही त्यांचे कारनामे सुरूच आहेत. दोन्ही मुलांना ते नंबर दोनचे धंदे करायला लावतात आणि स्वतः दस नंबर बनून उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची घट्ट पकडून बसले आहेत. सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या एका मुलाचे नाव भ्रष्टाचारात आलंय, तर दुसऱ्याचा दारू व्यवसायात. त्यांच्या एका मुलाची कंपनी पुण्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारात अडकली आहे, तर दुसऱ्याची टँगो नावाची दारू कंपनी आहे, ज्याला अजित पवार यांनी अबकारी मंत्री म्हणून निर्णय घेत संरक्षण दिलं, असा आरोप त्यांनी केला.
सपकाळ म्हणाले की, टँगो कंपनीला थेट फायदा मिळावा म्हणून अजित पवारांनी अबकारी खातं आपल्या ताब्यात ठेवलं आहे. या खात्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय ते स्वतः घेतात, ज्यामुळे टँगोला आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे राज्यात डबल गेम, डबल भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे जमिनीचे व्यवहार, तर दुसरीकडे दारू कंपनीला मिळालेलं संरक्षण, हा डबल धमाकाच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. त्यांनी अजित पवार यांना भस्म्या आजार झाला असल्याचं सांगत म्हटलं की, हा असा आजार आहे की कितीही खाल्लं तरी अजून खावंसं वाटतं. आधीच एवढं खाल्लंय, तरी अजून किती खाणार?
दरम्यान, पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदी प्रकरणानंतर विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, मुलगा पुण्यात 300 कोटी रुपयांचा व्यवहार करतो आणि वडिलांना काहीच माहिती नसते, हे कसं शक्य आहे? बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन विकत घेतली गेली आहे, त्यामुळे या प्रकरणात चौकशी आवश्यक आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, खडसेंच्या काळात असाच आरोप झाला होता, आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मग अजित पवारांनीही नैतिकतेचा आधार घेत राजीनामा द्यावा. कोरेगाव पार्क प्रकरणात न्यायमूर्ती झोटिंग समितीप्रमाणे चौकशी समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.
Ajit Pawar’s One Son Linked to Land Scam, Another to Liquor Business, Alleges Harshvardhan Sapkal
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी


















