विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दत्त दालमिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले ऊस दर आंदोलन चिघळले आहे. ऊस वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात असताना, कारखाना समर्थकांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना “ऊस वाहतूक रोखून दाखवाच” अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले, आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. Raju Shetti
दत्त दालमिया साखर कारखान्याने एफआरपीची मोडतोड करून गाळप सुरू केल्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याची संपूर्ण ऊस वाहतूक रोखली. यावेळी कारखाना समर्थकांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले, ज्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखर कारखानदार एकत्रित येऊन उसाला पहिली उचल म्हणून 3400 ते 3450 रुपये प्रति टन देत आहेत, जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही. संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे की, ऊस परिषदेत मागणी केलेल्या 3751 रुपये दराबाबत तोडगा न निघाल्यास, कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी. सध्या सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत असून, गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात मध्यस्थी करून तोडगा काढणे अपेक्षित होते, पण राज्य सरकार आणि कारखानदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये ऊस दरासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. राज्य सरकारने उसाला प्रती टन 3,300 रुपये इतका दर जाहीर केला आहे. दर जाहीर होताच बेळगाव जिल्ह्यातील गुर्ला पूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून आपला आनंद साजरा केला.
गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले होते आणि दोन मंत्र्यांनी केलेले मध्यस्थीचे प्रयत्न देखील निष्फळ ठरले होते. अखेरीस, शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत दर जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आज मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बंगळूरू येथे बैठक पार पडली आणि या बैठकीत हा नवीन दर जाहीर करण्यात आला.
Swabhimani farmers’ organization aggressive, heated argument between both groups : Raju Shetti
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















