विशेष प्रतिनिधी
मुंबई : Symbol War आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये मतदारांना यंदा अनोखे दृश्य पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिशिष्ट ड मधील यादीत तब्बल १६५ निवडणूक चिन्हे समाविष्ट असून, ही चिन्हे इतिहास, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यांचे अनोखे मिश्रण असल्याने निवडणुकीतील ‘चिन्हयुद्ध’ (Symbol War) रंगतदार ठरणार आहे.
यादीत जातं, रोबोट, ग्रामोफोन, सीसीटिव्ही कॅमेरा, डाल माऊस अशा कालानुरूप विविध युगातील वस्तूंचा समावेश आहे. काही चिन्हे आजच्या पिढीसाठी इतिहास तर काही भविष्यातील डिजिटल जगाचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तू, स्वयंपाकगृहातील साहित्य, आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि क्रीडा तसेच बांधकाम क्षेत्रातील साधने अशा विस्तृत श्रेणीतील चिन्हे मतदारांच्या हातात दिसणार आहेत. Symbol War
या चिन्हांच्या यादित कृषी आणि घरगुती जीवनाचा प्रभावही स्पष्ट जाणवतो. मिरची, ढोबळी मिरची, लसूण, फुलकोबी, मका, सफरचंद, पेरू, अननस, नारळ, कलिंगड अशी फळभाज्यांवर आधारित अनेक चिन्हे उमेदवारांना प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामुळे एखादा उमेदवार मिरचीचे चिन्ह घेऊन “आपल्याशिवाय भाजीला झणझणीतपणा नाही” किंवा लसूण चिन्हधारी उमेदवार “आपल्याशिवाय तडका चालत नाही” अशा शैलीत प्रचार करणार, अशीही शक्यता आहे.
पोळपाट, भाजणीपात्र, कढई, खलबत्ता, कपबशी, टोस्टर, गॅस सिलिंडर, बिस्किट आणि ब्रेड यांसारख्या वस्तूंची चिन्हेही आहेत. दैनंदिन जीवनाशी नाते असलेल्या या वस्तूंमुळे उमेदवारांच्या प्रचारात वैयक्तिक आणि विनोदी संदेश देण्याची संधी निर्माण होणार आहे.
त्याचप्रमाणे कंगवा, टुथब्रश, दंतमंजन अशी वैयक्तिक वापरातील चिन्हेदेखील मतदारांचे लक्ष वेधू शकतात. “कंगव्याशिवाय भांग कसा” किंवा “पेस्टशिवाय ब्रश अधुरा” असे प्रतीकात्मक संदेशही ऐकू आले तर आश्चर्य वाटणार नाही.
क्रीडाक्षेत्रातील बुद्धिबळ पट, कॅरम, फुटबॉल, बॅडमिंटनमधील फूल, तसेच जिममधील डंबेल्स अशी चिन्हे आहेत. संगीताशी संबंधित बासरी, गिटार, हेडफोन हे पर्यायही यादीत आहेत.
बांधकाम क्षेत्रातून ट्रॅक्टर, हायवा, हातोडा, करवत अशी चिन्हे उपलब्ध आहेत, तर कार्यालयीन जीवन दर्शवणारे टाइपरायटर, संगणक, कीबोर्ड यांचीही नोंद आहे. काही स्रोत सांगतात की, यंदा ई-वस्तूंवरील चिन्हांचा वापर वाढेल आणि युवा मतदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता अधिक आहे.
इतक्या विविध आणि मनोरंजक चिन्हांमुळे महानगरपालिका निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ग्रामीण जीवन, शहरी तंत्रज्ञान, घरगुती उत्पादने आणि आधुनिक उपकरणे यांचा संगम या निवडणुकीत नवे राजकीय संदेश आणि क्रिएटिव्ह प्रचारशैली निर्माण करू शकतो.
आगामी काही आठवड्यांत चिन्हाधारित घोषवाक्ये, मीम्स, पोस्टर्स आणि सोशल मीडिया प्रचार पाहायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Municipal Polls Turn into a ‘Symbol War’ as 165 Icons Hit the Ballot, from Robots to Rolling Pins
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















