विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंढव्यातील बॉटनिकल गार्डन जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा नेमका सहभाग काय हे तपासण्यासाठी, घटनेच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ४:३० या वेळेत त्यांचे मोबाईल ‘टॉवर लोकेशन’ आणि ‘सीडीआर’ (कॉल डेटा रेकॉर्ड) तपासण्यात यावेत,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. या प्रकरणात अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. Anjali Damania
मुंढवा जमीन प्रकरणावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील एक आरोपी असलेले हवेलीचे तहसीलदार सूर्यकांत येवले याला मिळालेल्या जामिनावर संशय व्यक्त करताना म्हणाल्या, जर येवलेला कोठडीत ठेवून त्याचा जबाब नोंदवला असता, तर पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचे नाव उघड झाले असते. हे सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच येवलेला जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांनी आता तातडीने न्यायालयात जाऊन येवलेचा जामीन अर्ज रद्द करावा आणि त्याला अटक करून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव वदवून घ्यावे.
दमानिया यांनी पोलिस डायरीतील नोंदींचे वाचन करून गंभीर बाबी समोर आणल्याचा दावा करताना दमानिया म्हणाल्या, आता अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. कारण पोलिस स्टेशन डायरीतले उल्लेख मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. १६ जून २०२५ दुपारी ४ वाजून २८ मिनिटांनी उपरोक्त विषयान्वये आम्ही मुंढवा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मुंढवा पोलिस ठाण्यात हे कळवण्यात आलं की अॅड. तृप्ती ठाकूर यांनी फोन करुन आमच्या सिक्युरीटी लोकांना बॉटेनिकल गार्डनमध्ये येऊ देत नाहीत त्यामुळे पोलिसांची कुमक पाठवा. अधिकाऱ्यांच्या आदेशाने आम्ही उपनिरीक्षक मुंडे यांच्यासह सदर ठिकाणी गेलो. त्यावेळी बॉटेनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम (वय-५७), महेश पुजारी आणि फिल्ड ऑफिसर सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस यांचे चार गार्ड हजर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेश मोरे यांनी नियुक्ती केली आहे. पण ती जागा बोटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने बाळासाहेब कदम यांनी सांगितलं. अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला त्यांनी पोलिसांना फोन केला. जागा रिकामी करुन घ्या अशी मागणी करतात.
बॉटनिकल गार्डनच्या जागेवर ‘अमेडिया’ कंपनीने हक्क सांगत जागा रिकामी करण्यासाठी दबाव टाकला होता. या कंपनीच्या वकिलाने फोन करून पोलिसांची फौज बोलावून घेतली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, कंपनीच्या माणसांकडे जागेची कोणतीही कागदपत्रे नव्हती. तरीही कंपनीचे वकील आणि बाऊन्सर्स यांनी तिथे जाऊन दादागिरी केली, असा आरोप दमानिया यांनी केला.
पार्थ पवार यांचा कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) तत्काळ मागवावा. त्यातील ‘कोड’वरून आणि टॉवर लोकेशनवरून घटनेच्या वेळी ते अडीच किलोमीटरच्या परिघात कुठे होते, याचा उलगडा होईल. तसेच पोलिस ठाण्यात आणि गार्डनमध्ये घुसणारी माणसे कोण होती, हे देखील तपासात निष्पन्न होईल, असेही दमानिया म्हणाल्या.
आतापर्यंत पार्थ पवार यांचे नाव एफआयरमध्ये घातले नाही, तर ते होईल. पोलिसांनी मोठा वकील ठेवून सूर्यकांत येवले यांचा अंतरीम जामीन रद्द करावा, त्यांना अटक करावी आणि हा सर्व प्रकार करण्यास कोणी भाग पाडले, याबाबत त्यांचा जबाब नोंदवावा. या सगळ्याचा उलगडा झाल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप बाहेर येतील. पार्थ पवारला कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाहीये. हे प्रकरण तडीस नेण्यासाठी मी लढत राहणार आहे, असा निर्धार अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.
Anjali Damania demands Parth Pawar’s mobile tower location and CDR in Mundhwa land case.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















