Vijay Wadettiwar : भाजपच्या इव्हेंटबाजीला मुंबईकर महिलेने दाखवला वास्तवाचा आरसा, विजय वडेट्टीवार यांची टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Vijay Wadettiwar भाजपच्या इव्हेंटबाजीला मुंबईकर महिलेने वास्तवाचा आरसा दाखवला. भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला,” अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केली.Vijay Wadettiwar

वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खरीखोटी सुनावली. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे.Vijay Wadettiwar



 

महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याने महायुतीच्या वतीने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांविरोधात आज (२१ एप्रिल) वरळीत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दुपारी १ च्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले होते. याच कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला आणि तिने गिरीश महाजन यांना झापले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता यावरून विरोधकांना भाजपवर टीका करण्याची संधी मिळाली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, “भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला. एकीकडे आरक्षणाचे कागदी घोडे नाचवायचे आणि इव्हेंट करणाऱ्याच्या नादात रस्ते अडवायचे, ही कसली पद्धत? कदाचित भाजपला वाटलं असेल की ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर जनतेला आरक्षणाचे महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे समजेल. पण मुंबईकर महिला आहे ती, तिला भाजपच्या इव्हेंट बाजी दिसली आणि तिथेच तिने सुनावले!

महिला आरक्षणाच्या नावाखाली धुंदीत असलेल्या नेत्यांना वास्तवाचा चटका दिला तो एका महिलेने. महिलांच्या प्रगतीचा रस्ता विरोधकांनी अडवला म्हणून बोंबाबोंब करणाऱ्यांना जनतेचे रस्ते अडवून धरल्यावर, सामान्य महिलेने त्यांना ‘रस्ता’ दाखवला यातच सगळं आलं! भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त दिखावा होता. पण महिला आघाडी विरुद्ध एकटी महिला असा सामना झाला तेव्हा निकाल वास्तवाच्या बाजूनेच लागला! असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

Mumbai woman exposes BJP’s “event politics”, Vijay Wadettiwar takes a swipe

महत्वाच्या बातम्या