विशेष प्रतिनिधी
पुणे : Census operations जनगणना कामकाजात निष्काळजीपणा व राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिकेने येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी महापालिका सहाय्यक आयुक्त तथा उपअभियंता राजेश गुर्रम यांना निलंबित केले आहे. महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.Census operations
महापालिकेच्या आदेशानुसार, जनगणना कामकाजासाठी २३ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार येरवडा-वडगावशेरी क्षेत्रासाठी राजेश गुर्रम यांची चार्ज जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जनगणना संचालनालय, मुंबई तसेच शहर जनगणना कार्यालयाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांनुसार संबंधित कामकाज कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.Census operations
प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या नोंदी करणे, नियुक्तीपत्रांचे वितरण, घरयादी गट तयार करणे, प्रशिक्षणाचे नियोजन, पर्यवेक्षकीय सर्कल निश्चित करणे, प्रगणक गटांचे वाटप करणे तसेच सीएमएमएस (CMMS) पोर्टलवरील कामकाजाचा आढावा घेणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. १६ मेपासून घरभेटींच्या माध्यमातून जनगणना कामाला सुरुवात झाली असून १४ जूनपर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
मात्र उपलब्ध मनुष्यबळाचे तसेच जनगणना प्रक्रियेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे न केल्याने कामकाज मोठ्या प्रमाणात रखडल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडून वारंवार आढावा घेऊन काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तरीही गुर्रम यांनी कामकाजाबाबत दिशाभूल केल्याचा आणि आवश्यक कार्यवाही टाळल्याचा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे.
येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील एकूण १,०३९ प्रगणक गटांपैकी केवळ ५४० गटांमध्येच जनगणना काम सुरू असल्याचे आढळून आले. उर्वरित ४९९ गटांमध्ये कामकाज सुरूच झाले नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही बाब गंभीर मानण्यात आली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५६ (२) (फ) अन्वये खातेनिहाय चौकशी पूर्ण होईपर्यंत गुर्रम यांना महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून महापालिका सेवाविषयक आणि वर्तणूक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच अतिरिक्त आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना महापालिका क्षेत्र सोडता येणार नाही.
दरम्यान, गुर्रम यांच्याविरोधातील प्रस्तावित खातेनिहाय चौकशीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना परिमंडळ क्रमांक १ चे उपआयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असून त्यातील विलंबाबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
Assistant Commissioner suspended over negligence in Census operations in Yerawada-Vadgaon Sheri
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन