पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्याच्या वाढत्या वाहतूकोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भूमिपूजन झालेल्या तीन महामार्गांच्या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूककोंडीत तब्बल ३० टक्क्यांहून अधिक घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. Devendra Fadnavis

महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआयडीसी) मार्फत हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले.

पुण्यात आयोजित तीन महामार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या महामार्गांची संकल्पना मांडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. या मार्गांवरील उड्डाणपुलांसोबत भविष्यातील गरज लक्षात घेऊन मेट्रोचे पिलरही उभारले जाणार आहेत. तसेच नाशिक फाटा ते राजगुरूनगर या रस्त्याच्या कामासाठी लवकरच १२६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या प्रकल्पालाही गती मिळणार आहे.

पुरंदर विमानतळासाठी ट्विन टनेल उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हडपसर ते यवत या ३१.५ किलोमीटरच्या मार्गावर वर आणि खाली अशा सहा पदरी रस्त्याची उभारणी होणार असून, त्यामुळे नागरिकांना कोंडीमुक्त आणि जलद प्रवासाचा मोठा लाभ मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

एचसीएमटीआर रस्त्याच्या कामाला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार असून, पाताळ लोक (अंडरग्राऊंड) रस्ते प्रकल्पालाही गती दिली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. पुणे ग्रँड टूरसाठी विकसित करण्यात आलेले रस्ते यंदाच्या पावसाळ्यातही टिकाऊ ठरल्याचे सांगत, भविष्यातही अशाच दर्जेदार रस्त्यांची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार करून पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून, सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी अत्याधुनिक एसटीपी यंत्रणा उभारण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. या सर्व विकासकामांचा नियमित आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे हे शिक्षणाबरोबरच माहिती तंत्रज्ञान आणि रोजगाराचे प्रमुख केंद्र बनले असल्याचे सांगितले. मात्र, वाढत्या वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी हे तीन महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पांसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचा उल्लेख करत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याच्या विकासासाठी निधीची कधीही कमतरता भासू दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या महामार्गांमुळे पुढील ५० ते १०० वर्षांच्या दृष्टीने पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असे सांगितले. तसेच शहरात ३०० किलोमीटरहून अधिक लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याचा मानस व्यक्त करत, दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Three Highways to Ease Pune’s Traffic Congestion, Says CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या