Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; पुण्यातील प्रसिद्ध ‘गोल्डन बेकरी’चा परवाना ‘एफडीए’कडून निलंबित

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील बेकरी, डेअरी आणि हॉटेलमध्ये अस्‍वच्‍छता आढळल्‍याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. 24 तासांत एकूण 10 बेकरी आणि हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये पुण्याच्या प्रसिद्ध ‘गोल्डन बेकरी’चा समावेश आहे. गुरुवारी (ता. 16) आणि शुक्रवारी (ता. 17) करण्यात आलेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पुण्याच्या कोंढवा येथील ‘गोल्डन बेकरी’, येवलेवाडीतील ‘गोल्डन मॅजेस्टिक बेकरी’, मंगळवार पेठेतील ‘स्टार केटरिंग सर्व्हिस’, सोमवार पेठेतील ‘अशोक बार अँड रेस्टॉरंट’ आणि बाणेर परिसरातील ‘बिकांगे बिर्यानी एलएलपी’वर एफडीएने तातडीची कारवाई करत सर्वच आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. याबाबतच्या अस्वच्छतेची छायाचित्रेही एफडीएने प्रसिद्ध केली आहेत. त्‍यामध्‍ये हे अन्‍नपदार्थ किती अस्‍वच्‍छ आणि गलिच्‍छ जागेत तयार केले जातात हे दिसून येते.

दरम्यान, ही परवाने निलंबनाची कारवाई केवळ पुणे शहरातच नव्हे, तर पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील काही आस्थापनांवरही करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्याच्या अंबेगाव तालुक्यातील पारगाव पेठ येथील ‘सिद्धार्थ ॲग्रो डेअरी’, महाबळेश्वरमधील ‘सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा’ आणि ‘सिगडी रेस्टॉरंट’, कोल्हापूरच्या करवीर येथील ‘व्हीबीजीओआर शाळा कॅन्टीन’, तसेच सांगलीतील ‘हलद भवन’ कॅन्टीनचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.

बटरऐवजी फॅट स्प्रेडचा वापर
‘बन मस्का’मध्ये बटरऐवजी फॅट स्प्रेडचा वापर करणाऱ्या लोहगाव येथील मे. आर. ए. टी. एंटरप्रायझेस (फ्रेंचायझी अभिनंदन टी) या आस्थापनेची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. एफडीएने शुक्रवारी ही कारवाई केली. तपासणीदरम्यान, ग्राहकांना बन मस्का विकताना त्यात बटरऐवजी ‘न्यूट्रलाईट प्रोफेशनल व्हेजिटेबल फॅट स्प्रेड’ वापरले जात असल्याचे आढळले. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड केली जात असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा कोणत्याही बेजबाबदार आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला असून आगामी काळातही ही कारवाईची मोहीम अशीच तीव्र राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe: Tukaram Mundhe takes bold action; FDA suspends the license of Pune’s famous ‘Golden Bakery’.

महत्वाच्या बातम्या