‘ती’ राजकीय भेट नव्हती, सुनील तटकरे यांची स्पष्टीकरणावर स्पष्टीकरणे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे तटकरे यांना स्पष्टीकरणावर स्पष्टीकरणे द्यावी लागत आहेत. जर ती कोणतीही राजकीय भेट असती, तर मी स्वतः जरूर सुनेत्रा पवार यांना त्याबद्दल पूर्वकल्पना दिली असती. परंतु, ती राजकीय भेट नसल्यामुळे त्याबाबत वेगळे सांगण्याचे काही कारण नव्हते,असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे.

मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एकाच वेळी उपस्थिती होती. या नाट्यमय घडामोडींवरून अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सुनावल्याची चर्चा आहे. या अंतर्गत वादानंतर अखेर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर जाहीर स्पष्टीकरण दिले आहे.



बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षाचे काही वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा विषय निघाल्यानंतर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे महायुतीत कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून आम्हीही त्या बैठकीला उपस्थित राहिलो, असं तटकरे म्हणाले.तटकरेंच्या या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. असे असले तरीही, ही बाब मला आधी सांगणे तुम्हाला आवश्यक वाटले नाही का? असा थेट प्रश्न सुनेत्रा पवार यांनी विचारले.

कोअर कमिटीच्या बैठकीतील वादाची बातमी बाहेर आल्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, जयंत पाटील आणि आमची वर्षा बंगल्यावर एकत्र भेट झालेली नाही. जयंत पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील काही कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. मी गेल्या आठवड्यातच राज्यातील काही प्रस्तावांबाबत मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली होती. अधिवेशनापूर्वी सर्व खासदारांना एकत्र बोलावून राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्याची आणि पाठपुरावा करण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री उपलब्ध असल्यामुळे आम्हाला बोलावण्यात आले होते. जर ती कोणतीही राजकीय भेट असती, तर मी स्वतः जरूर सुनेत्रा पवार यांना त्याबद्दल पूर्वकल्पना दिली असती. परंतु, ती राजकीय भेट नसल्यामुळे त्याबाबत वेगळे सांगण्याचे काही कारण नव्हते, असं सुनील तटकरे म्हणाले.

It Wasn’t a Political Meeting’: Sunil Tatkare Issues Yet Another Clarification

महत्वाच्या बातम्या