विशेष प्रतिनिधी
मुंबई :- तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली आणि रेशनकार्डधारक महिलांना दरवर्षी मोफत साडी देणारी महत्त्वाकांक्षी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ आता बंद करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत जून 2023 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील पिवळे रेशनकार्ड कुटुंबांतील महिलांना दरवर्षी एक साडी मोफत देणे हा होता. यामागे गरीब कुटुंबांना वस्त्र पुरवणे आणि राज्यातील यंत्रमाग क्षेत्राला आर्थिक चालना देणे असा दुहेरी हेतू होता.
परंतु, वस्त्रोद्योग विभागाने काढलेल्या नवीन निर्णयानुसार, सध्या विभागांतर्गत अनेक विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा आगामी आर्थिक भार आणि शासनाची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, ही योजना पुढील वर्षात सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही योजना बंद करण्यात येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
25 लाख कुटुंबांना फटका
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 25 लाख पिवळे रेशनकार्ड कुटुंबांना दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर साड्यांचे वाटप केले जात होते. यासाठी शासनाकडून दरवर्षी 100 कोटी रुपयांची वार्षिक तरतूद केली जात होती. सन 2023, 2024 आणि 2025 अशी सलग तीन वर्षे या साड्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले होते. मात्र, चालू वर्षात ही योजना पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे, यंदाच्या दिवाळीत गरीब कुटुंबातील महिलांना शासनाकडून मिळणारी हक्काची साडी मिळणार नाही, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये आता विविध चर्चांना उधाण आले आहे.
Major government decision! Free saree scheme discontinued.
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा