Jayant Patil : जयंत पाटील – एकनाथ शिंदे भेट, पुन्हा रंगल्या राजकीय चर्चा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jayant Patil  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत तर्कवितर्कांना पुन्हा चालना मिळाली होती.Jayant Patil

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित असल्याची चर्चा होती. त्यामुळे या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, या चर्चांवर स्वतः जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले होते. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.Jayant Patil



 

त्यावेळीच नगरविकास विभागाचे प्रमुख असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या विषयावर भेटणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिंदे यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीदरम्यान कोणताही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या भेटीत केवळ ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या प्रकरणावर चर्चा झाली की इतर राजकीय विषयांवरही सविस्तर चर्चा झाली, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट सत्ताधारी महायुतीत सहभागी होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या संभाव्य समीकरणात शरद पवार गटाला वित्त आणि नियोजन खाते मिळू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जयंत पाटील हे वित्त खात्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात असले, तरी हे खाते राष्ट्रवादीकडे देण्यास शिवसेनेच्या शिंदे गटाचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे आणि जयंत पाटील यांची भेट अधिकच महत्त्वाची ठरत आहे.
मात्र, या सर्व चर्चांवर अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भेटी केवळ प्रशासकीय विषयापुरत्याच मर्यादित होत्या की त्यामागे मोठी राजकीय रणनीती आखली जात आहे, याकडे राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jayant Patil meets Eknath Shinde, political buzz resurfaces

महत्वाच्या बातम्या