विशेष प्रतिनिधी
बारामती : प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत. बारामतीसह देश आणि राज्याच्या विकासात शरद पवारांचे योगदान प्रेरणादायी आहे, अशी भावनिक पोस्ट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मात्र मतदानाला येणार नाही. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट केले आहे.
सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे की, “आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली आहे. साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आणि विकासाच्या विचारांची दिशा पुढेही कायम राहील.
शरद पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले होते की, पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो.
बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. कोणत्याही प्रमुख पक्षाचा उमेदवार त्यांच्याविरोधात रिंगणात नाही. त्यामुळे ही लढत एकतर्फी ठरली आहे. असे असूनही मताधिक्य किती असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार मतदानाला येणार नसले तरी त्यांचे आशीर्वाद लाखमोलाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Sunetra Pawar shares emotional post
महत्वाच्या बातम्या