विशेष प्रतिनिधी
मुंबई : मूळच्या जम्मू आणि काश्मीरमधील असलेल्या एका महिला क्रिकेटपटूने उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून तब्बल ६३ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संबंधित महिला क्रिकेटपटू फारखांदा खान हिला तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि साथीदार इम्तियाज वाणी यांच्यासह अटक केली आहे.
फारखांदा खान ही जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून ती महिला टी-२० स्पर्धांमध्येही सहभागी झाली होती. पोलिसांनी फारखांदा आणि तिच्या भावाला दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक केली, तर इम्तियाज वाणी याला श्रीनगर येथून ताब्यात घेतले.
तपासानुसार, दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात राहणारा २८ वर्षीय उद्योगपती २०२४ मध्ये काही काळ पश्चिम उपनगरात राहत असताना फारखांदाच्या संपर्कात आला. दोघांमध्ये ओळख वाढल्यानंतर जवळीक निर्माण झाली. मात्र, नंतर फारखांदाने पैशांची मागणी केली. उद्योगपतीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने धमकावण्यास सुरुवात केली.
पैसे न दिल्यास मोबाईलवरील खाजगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देत फारखांदाने उद्योगपतीकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. सुरुवातीला २३ लाख आणि त्यानंतर ४० लाख रुपये अशा एकूण ६३ लाखांची उकळपट्टी झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. एप्रिल २०२४ पासून ही उकळपट्टी सुरू असल्याची माहिती आहे.
उकळलेली रक्कम काही प्रमाणात इम्तियाज वाणीच्या बँक खात्यात तर काही रक्कम फारखांदाच्या वडील आणि भावाच्या खात्यात वळवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बाझिल अझीझ खान हाही उद्योगपतीला सातत्याने धमक्या देत होता, अशी माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामागील नेमकी यंत्रणा आणि उद्योगपतीला जाळ्यात कसे ओढले गेले, याचा तपास पोलीस करत असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
Woman cricketer arrested in sextortion case, ₹6.3 million extorted from businessman
महत्वाच्या बातम्या