लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुण्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना पॅरोल देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

कॅबिनेट बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, लैंगिक गुन्ह्यांमधील ८० ते ९० टक्के आरोपी हे पूर्वीच्याच गुन्ह्यात जामीन किंवा पॅरोलवर सुटलेले असतात आणि त्या काळात ते पुन्हा असेच गंभीर गुन्हे करतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी २०१४ ते २०१९ या काळात आपण मुख्यमंत्री असताना अशा गुन्हेगारांना पॅरोल न देण्याचा कायदा केला होता. काही काळ तो अमलातही होता; परंतु नंतर तो न्यायालयाने रद्दबादल केला. आता यावर कोणताही पर्याय नसताना पुन्हा नव्याने कठोर कायदा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत.



नसरापूरमधील दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा संवाद साधला आहे. याविषयी माहिती देताना ते म्हणाले, “अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली जावी, अशी भावना सर्वांचीच असते. मात्र, लोकशाही कायद्याने चालते. त्यामुळे कायद्यात कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होईल, यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) वेळेत दाखल करून हा खटला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालवला जाईल. तसे लेखी आश्वासन पीडितेच्या कुटुंबालाही देण्यात आले आहे.”

पुण्यातील नसरापूर येथे सुट्टीनिमित्त आजीच्या घरी आलेली चार वर्षांची चिमुकली १ मे रोजी घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी ६५ वर्षीय आरोपीने तिला ओढून गोठ्यात नेले आणि तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केले. इतक्यावरच तो थांबला नाही, तर क्रूरतेची हद्द ओलांडत त्याने चिमुकलीला दगडाने ठेचून ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून पळ काढला. या नराधमाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Do not grant parole to sexual assault convicts, directs Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या