नाशिकमध्ये 11,000 कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार 294 सामंजस्य करार

विशेष प्रतिनिधी

नाशिक : जिल्हा विकास अन् उद्योगवाढीसाठी गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योग विभागाने आता सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये तब्बल 11,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. त्यासाठी आयोजित ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये तब्बल 294 सामंजस्य करार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहेत. Devendra Fadnavis

यातून आगामी 5 वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये एकूण 35 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. सिंहस्थ प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, उद्योग विभागाने हे उद्योग कायमस्वरूपी नाशिकमध्ये स्थिर व्हावेत, यासाठी या उपक्रमाचे आयोजन व प्रक्रियेची तयारी केली आहे.

आजच्या समिटमध्ये 294 सामंजस्य करार करण्याची तयारी आहे. यापूर्वीही नाशिकमध्ये 18,000 कोटींची गुंतवणूक आली आहे. त्यातील कंपन्या जमिनी घेणे, बांधकामे सुरू करणे व विविध परवानग्या घेण्याच्या स्तरावर आहेत. याचे दृश्य परिणाम खऱ्या अर्थाने पुढील 3 ते 5 वर्षांत दिसून येतील, असे उद्योग विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य, दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.



नाशिकमध्ये आधीच महिंद्राची मोठी गुंतवणूक आहेच; परंतु आता ईव्ही कारचाही प्लँट नाशिकमध्येच सुरू करण्यासाठी आडवण येथे 5,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच लॉजिस्टिक सपोर्टही सुरू केला जाईल. या दोन्हींमधून 10 ते 12 हजार रोजगार निर्माण होतील.

संरक्षण साहित्य उत्पादनात कार्यरत बेर्निको वेगार्ड या जर्मन कंपनीकडूनही नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यात 1 हजार आणि टप्प्याटप्प्याने 3 हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी गेली काही दिवस चाचपणी सुरू आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सामंजस्य करार करण्यासंदर्भात या कंपनी व प्रशासनाची चर्चा सुरू होती. नाशिकचे मुंबई आणि वाढवण बंदर यांच्यासोबत असलेले कमी अंतर, उत्तम हवामान, कुशल मनुष्यबळ, डिफेन्स हबमध्ये नाशिकचा समावेश यामुळे कंपनी ही गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे.

294 MoUs worth ₹11,000 crore to be signed in Nashik in presence of Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या