शक्तीपीठ महामार्गासाठी सुधारित अधिसूचना जारी; कोल्हापूरातील ७८ गावे नव्या आराखड्यात

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : वर्धा ते सिंधुदुर्ग (पत्रादेवी) दरम्यान प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र शासनाने गुरुवारी सुधारित अधिसूचना जारी केली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ७८ गावांचा नव्या संरेखनात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Shaktipeeth Expressway

महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, हा प्रस्तावित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे सुमारे ८०२.६ किलोमीटर लांबीचा असून नागपूर ते गोवा दरम्यान उभारण्यात येणार आहे. हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणार असून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट किनारपट्टीशी जोडण्याचा शासनाचा उद्देश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यातील ७८ गावांमधून महामार्गाचे नवीन संरेखन निश्चित करण्यात आले आहे. पूर्वीच्या अधिसूचनेतील काही गावांच्या सीमा आणि मार्गामध्ये बदल करण्यात आले असून त्यानुसार सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.



महामार्ग प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात सुपीक शेती, ऊस पट्टा, वनक्षेत्र आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राधानगरी, गगनबावडा आणि चंदगड परिसरातील जंगल क्षेत्र, जैवविविधता आणि वन्यजीवांवर परिणाम होण्याबाबत पर्यावरण अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, शासनाच्या मते हा महामार्ग राज्यातील औद्योगिक विकास, पर्यटन आणि वाहतूक सुलभतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ कमी होणार असून मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, बाधित गावांतील शेतकऱ्यांनी जमिनींचे अधिग्रहण, नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. काही भागांत स्थानिक संघटनांकडून आंदोलनाची तयारी सुरू असून येत्या काळात या प्रकल्पाविरोधातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Revised Shaktipeeth Expressway Plan Includes 78 Villages in Kolhapur

महत्वाच्या बातम्या