Monsoon : अंदमानात मोसमी पावसाची चाहूल; महाराष्ट्रात १५ ते २० जूनदरम्यान आगमनाची शक्यता

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Monsoon  राज्यभरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष आता आगामी पावसाळ्याकडे लागले आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र तसेच अंदमान-निकोबार बेट परिसरात मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून या आठवड्याच्या अखेरीस नैऋत्य मोसमी पावसाचे अंदमानात आगमन होण्याची शक्यता आहे.Monsoon

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मोसमी पाऊस अंदमानात नेहमीपेक्षा पाच ते सहा दिवस आधी दाखल होऊ शकतो. सामान्यतः अंदमान-निकोबार बेटांमध्ये २० ते २२ मेदरम्यान मोसमी पावसाचे आगमन होते. गेल्या वर्षी मात्र १३ मे रोजीच पाऊस दाखल झाला होता. यंदाही वातावरणीय स्थिती वेगाने अनुकूल होत असल्याने पावसाची लवकर सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.Monsoon



अंदमानात पाऊस स्थिरावल्यानंतर त्याची पुढील वाटचाल केरळच्या दिशेने होते. हवामान विभागाच्या दीर्घकालीन नोंदीनुसार, केरळमध्ये साधारणतः १ जून रोजी मोसमी पाऊस दाखल होतो. त्यानंतर पुढील १० ते १२ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होते. त्यामुळे यंदा राज्यात १५ ते २० जूनदरम्यान मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, “सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती आहे. वाऱ्यांचा वेग, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण हे मोसमी पावसासाठी अनुकूल आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.”

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यावर ‘एल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केली होती. यामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी, म्हणजेच सुमारे ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एल निनोमुळे पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता असून काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत कमी पाऊस पडू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

तथापि, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, पावसाचे आगमन वेळेवर होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. त्यामुळे शेती क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. विशेषतः खरीप हंगामासाठी पावसाचे वेळेवर आगमन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

मे महिन्याच्या अखेरीस भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मोसमी पावसाचा सुधारित आणि अधिक सविस्तर अंदाज जाहीर केला जाणार आहे. या अंदाजात राज्यनिहाय आणि विभागनिहाय पावसाचे प्रमाण, वितरण आणि संभाव्य परिस्थिती स्पष्ट होणार असल्याने शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि प्रशासनाचे लक्ष त्या अहवालाकडे लागले आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीसाठे कमी होत असताना आणि उष्णतेमुळे पिकांवर परिणाम होत असताना, यंदाचा पावसाळा किती समाधानकारक ठरणार याबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Monsoon Likely to Hit Andaman Early; Maharashtra May Receive Rains Between June 15 and 20

महत्वाच्या बातम्या