विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक व क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर दोन चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर ३८.१०० येथे सायंकाळी सुमारे ५.०५ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक के ए 56 – 2199 हा पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने समोरून जाणाऱ्या
आर जे -19 जी जी -4175 या ट्रकला तसेच एम एच -04-जी आर -2874 या कंटेनर ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तिन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली.
या भीषण अपघातात के ए -56- 2199 मधील चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. तर राजस्थान येथील वीर बळराम आणि उत्तर प्रदेश येथील जिशान अली (वय ३१) हे दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त वाहनांमधील रंगाचे डबे व पावडरच्या बॅगा रस्त्यावर पडल्याने द्रुतगती मार्गावरील चारही लेन काही काळ वाहतुकीसाठी प्रभावित झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, पोलीस निरीक्षक हिरे, IRB पथक, देवदूत टीम तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
Horrific Accident on Mumbai-Pune Expressway Leaves Driver and Cleaner Dead on the Spot
महत्वाच्या बातम्या