विशेष प्रतिनिधी
मुंबई : येस बँकेचे माजी अध्यक्ष राणा कपूर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली असून तब्बल 1 हजार कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकीप्रकरणी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सिक्युरिटी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक सुधीर वालिया यांच्यासह इतरांनाही आरोपी करण्यात आले असून तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
ही संपूर्ण फसवणूक येस बँक आणि एचआयडीएल समूहाच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाशी तसेच तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, 2015-16 दरम्यान HDIL समूहाची उपकंपनी ‘सफायर लँड डेव्हलपमेंट’ आणि ‘प्रिव्हिलेज पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ यांनी येस बँकेच्या वरळी शाखेकडून अनुक्रमे 150 कोटी आणि 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या बदल्यात कंपन्यांनी सुमारे 1000 कोटी रुपयांची मौल्यवान मालमत्ता तारण ठेवली होती. कर्जफेडीसाठी 36 महिन्यांची मुदत देण्यात आली होती.
मात्र, कर्जाची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच जून 2018 मध्ये येस बँकेने संबंधित खाते ‘नॉन-परफॉर्मिंग ॲसेट’ म्हणून घोषित न करता आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया न पाळता तारण ठेवलेली मालमत्ता ‘सिक्युरिटी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड’कडे हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या हस्तांतरणासाठी बँकेने स्वतः 22.5 कोटी रुपयांचे मार्जिन मनी उपलब्ध करून दिले आणि ते अंतर्गत ट्रस्ट खात्यांमार्फत फिरवून व्यवहार पूर्ण करण्यात आला. तसेच, कोट्यवधी रुपयांची तारण मालमत्ता बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीत विकण्यात आल्याने HDIL समूहाला सुमारे 1000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी ‘सफायर लँड डेव्हलपमेंट’ कंपनीचे निलंबित संचालक लखमिंदर दयाल सिंह यांनी वरळी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, राणा कपूर आणि इतर बँक अधिकाऱ्यांनी संगनमत करून कंपनीची मौल्यवान जमीन हडपण्यासाठी गुन्हेगारी कट रचला.
विशेष म्हणजे, येस बँकेच्या 2019 च्या विशेष ऑडिट अहवालातही या व्यवहारांवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. वरळी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 409 (गुन्हेगारी विश्वासघात) आणि कलम 120बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. राणा कपूर यांच्याविरोधात यापूर्वीही ईडी आणि सीबीआयमार्फत येस बँकेशी संबंधित अनेक आर्थिक घोटाळ्यांचे गुन्हे दाखल आहेत.
Fresh Trouble for Rana Kapoor; Case Registered in New ₹1,000 Crore Financial Fraud Scam
महत्वाच्या बातम्या