पोक्सोची धमकी देऊन प्राचार्यांना लुटणारे पोलीस अखेर गजाआड, रील स्टार महिला पोलीस अद्याप फरार

विशेष प्रतिनिधी

पुणे: बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून ७ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह दोन जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच पोलीस दलामधून या खंडणीखोरांना बडतर्फ केले आहे.

पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलीस कर्मचारी सुदाम तायडे यांचा अटक करण्यात आलेल्यामध्ये समावेश आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. मात्र, या संपूर्ण कटातील मुख्य सूत्रधार आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ‘दामिनी’ पथकातील महिला पोलीस शिपाई सोनाली हिंगे ही अद्याप पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरली असून, पोलीस तिचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.



या प्रकरणातील पीडित तरुणीची ओळख महिला पोलीस हिंगे हिच्याशी एका व्यायामशाळेत झाली होती. हिंगे हिने तरुणीला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवले. त्यानंतर या तरुणीला जाळ्यात ओढून, तिचा वापर करत उपनिरीक्षक बडे, तायडे आणि हिंगे यांनी थेट संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती घातली. अब्रू जाण्याच्या भीतीने प्राचार्यांनी या टोळीला ७ लाख रुपये दिले.

आरोपी पोलिसांनी त्या पीडित तरुणीला प्रवेश तर मिळवून दिला नाहीच, उलट तिने दुसऱ्या महाविद्यालयात घेतलेला प्रवेशही या गोंधळामुळे रद्द झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने कुटुंबीयांसह थेट पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयुक्तांनी तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आणि खाकी वर्दी डागाळणाऱ्या या तिघांनाही थेट पोलीस सेवेतून बडतर्फ केले.
या घटनेमुळे पुणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, फरार महिला पोलीस शिपाई सोनाली हिंगे हिच्या अटकेनंतर या टोळीने आणखी कोणाकोणाला असे ब्लॅकमेल करून लुटले आहे, याचे अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.

Cops who extorted principal using POCSO threat arrested; reel-star woman constable still absconding

महत्वाच्या बातम्या