खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक? विश्वास नांगरे पाटलांना काँग्रेसचा सवाल

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावत संघाचे आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान केल्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जाेरदार हल्लाबाेल केला आहे. “विश्वास नांगरे पाटील यांनी संविधानापेक्षा संघाला मोठे मानले का? ते संविधानाचे अधिकारी म्हणून बोलत होते की विशिष्ट विचारधारेचे प्रतिनिधी म्हणून?” असा सवाल केला आहे .

काॅंग्रेसने केलेले सवाल पुढीलप्रमाणे :

1. विश्वास नांगरे पाटील यांनी या कार्यक्रमासाठी गृह विभाग किंवा राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती का? जर घेतली असेल, तर त्याची प्रत सार्वजनिक करणार का? आणि जर परवानगी नसेल, तर नियमांच्या संभाव्य उल्लंघनाबद्दल सरकार त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे?

२. पोलीस दलातील अधिकारी हा कायद्याचा रक्षक असतो, विचारधारेचा प्रचारक नाही. एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिचे उदात्तीकरण करणे हे एका आयपीएस अधिकाऱ्याला शोभते का?



3. संघाच्या मंचावर जाऊन त्यांचे कौतुक करणे ही तटस्थता आहे की एका विशिष्ट प्रवाहाशी निष्ठा व्यक्त करणे? जर उद्या एखादा अधिकारी दुसऱ्या धार्मिक किंवा राजकीय संघटनेच्या मंचावर जाऊन गुणगान करू लागला, तर प्रशासनावर जनतेचा विश्वास कसा टिकेल?

4. भारतीय संविधान सर्व भारतीयांचे आहे. एका संविधानिक अधिकाऱ्याने एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिचे सार्वजनिक गौरवगान करणे ही संविधानिक तटस्थता मानली जाऊ शकते का?

5. जेव्हा एखादा अधिकारी विशिष्ट विचारधारात्मक मंचावर गौरवोद्गार काढतो, तेव्हा उद्या त्याच्या निर्णयांवर त्या विचारधारेचा प्रभाव पडणार नाही याची खात्री कोण देणार?

6. संघाच्या मंचावर जाऊन सार्वजनिकरीत्या त्याचे गुणगान करणे ही “Association” (संबंध) मानली जाणार नाही का?

वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का?

, “सामान्य पोलीस कर्मचारी राजकीय भूमिका घेताना आढळला तर त्याच्यावर कारवाई होते, मग वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का? आज प्रश्न विश्वास नांगरे पाटील या व्यक्तीचा नाही, तर प्रशासकीय विश्वासार्हतेचा, खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेचा आणि संविधानाच्या सर्वोच्चत्वाचा आहे.” या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि संबंधित परवानग्या सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Congress Questions Vishwas Nangare Patil: Police Officer in Uniform or RSS Campaigner?

महत्वाच्या बातम्या