विशेष प्रतिनिधी
पुणे : नको ते उद्योग करू नका. नाहीतर परिणामांना सामोरे जावे लागेल असा दम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी भुजबळ समर्थकांना दिला आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. संतप्त झालेल्या भुजबळ समर्थकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारी आंदोलन केले. अजित पवारांच्या फोटोला जोडे मारल्याने दीपक मानकर भडकले आहेत. याबाबत बोलताना मानकर म्हणाले, नाही ते उद्योग करू नका. नाहीतर परिणाम भोगावे लागतील. जशास तसे उत्तर दिले जाईल.
दरम्यान, राज्य मंत्री मंडळात समावेश झाला नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिक येथे आले. पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर आगपाखड केली. भुजबळ म्हणाले, तुम्ही उठ म्हणाले की उठ आणि बस म्हणाले की बस हे ऐकणारा छगन भुजबळ मनुष्य नाही. आलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या वेदना आणि दुःख मांडले. मी पण त्यांना जे घडले आहे ते सांगितलं. मी माझ्या मतदार संघात आज जातोय . उद्या पुन्हा एक समता परिषेदेची बैठक आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे. सुसंस्कृत पणे आपल्या भावना व्यक्त करा असे सांगितले. जोडे मारो आंदोलन करू नका असे आवाहन मी केले आहे.
भुजबळ म्हणाले, प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या प्रकारे अवहेलना केली त्याचा आहे. पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात. आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील मला वरुन निवडणूक लढण्यासाठी सांगितले होते. एक महिना झाला तरी माझं नाव जाहीर झाले नाही. माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवट पर्यंत आग्रह धरला होता. मी 40 वर्षांपासून मी इथे आहे म्हणून मला राज्यसभा द्या अशी माझी मागणी होती, असे सांगून भुजबळ म्हणाले, मी लढलो. जिंकून आलो आणि आता मला जाण्यासाठी सांगत आहेत. प्रफुल पटेल हे समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्याशी बोलत आहेत.