विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या घेतलेल्या भेटीवर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.एक फार मोठं डील झाल आहे. मला एका प्रमुख माणसाने सांगितलं सुरेश धस माघार घेतील. त्यांची ती परंपरा आहे. एखाद मोठा डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले. ज्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले. ज्या पद्धतीने त्यांनी काही कागदं आणि पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला. आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो? याच भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं.मला एका प्रमुख माणसाने सांगितलं सुरेश धस मागार घेतील, त्यांची ती परंपरा आहे. एखाद मोठा डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील .
राऊत म्हणाले,या संदर्भात जे लढ्यात उतरले आहेत, सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमानिया असतील, त्यांच्याशी या विषयावर बोलेन बावनकुळे सुरेश धस यांचे बॉस आहेत, असे ते म्हणतात. देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटणं जावो हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहे. ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्यांनी तिकडून बैठकीतून बाहेर पडले पाहिजे होते. याला नैतिकता म्हणतात . त्यांनी बाहेर येऊन आणि सांगायला पाहिजे होते की माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झाला आणि मला ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला. म्हणून मी इथून बाहेर पडलो. त्यांची हिंमत आहे का असे सांगायची.
संवाद राजकारणात असला पाहिजे. पण गुन्हेगारांशी असावा का? ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांचा राजीनामा मागितला जातो खून प्रकरणात त्यांच्याशी संवाद ठेवावा असं कोणाचं म्हणणं असेल तर महाराष्ट्रात प्रत्येक राजकारण्यांना गुन्हेगारांशी संवाद साधावा लागेल.हे टोलवाटोलवी करत आहेत, या कोर्टातून त्या कोर्टावर टाकत आहेत. आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते बीडला जाणार आहोत. त्यानंतर आम्ही तिकडे गेल्यावर उद्धव ठाकरे तिकडे येतील. आम्ही देशमुख कुटुंबीयांची जाऊन भेट घेणार आहोत. शिवसेनेला आता या विषयात लक्ष घालावे लागेल. देशमुख कुटुंबाची फसवणूक झाली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीबाबत दिलेल्या तंबीवर राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लिक होत होता आणि तेच लोक आता त्यांच्या सरकारमध्ये आहेत. फितूर इकडे होते, तेच आता तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. फितूर त्यांचे काम योग्य प्रकारे करत आहेत. आधीच्या राज्यात सुद्धा याचं लोकांनी हेच उद्योग केले. आता सुद्धा फडणवीस यांच्या सरकारमध्ये तेच उद्योग सन्मानाची पद घेऊन बसलेली आहेत. ते त्यांचे भूमिका योग्य पद्धतीने करत आहेत
एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले, विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोग, पैसा, यंत्रणेचा वापर केला. तुम्ही ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण आता बांधलेल आहे. चोरलेलं आहे. ते काही योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढतायत त्या बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेनाप्रमुखांना मान्य आहे का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे . त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल, तर कामाख्या मंदिर किंवा अन्य कुठे जायचं असेल तर त्यांनी जाव आणि आत्मचिंतन कराव. आपण मूळ शिवसेनेबाबत जे विधान करतो ते किती तथ्य आणि सत्य आहे याचा विचार करावा.काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही
भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही. त्यांनी बेइमानी केली. त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. त्यांच मत फक्त त्यांना कोणत्या खाते मिळत आहे याच्यावर होत. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या एका प्रमुख नेत्याने सांगितलं एकनाथ शिंदे फार ज्युनिअर आहेत. त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही. हे मी वारंवार सांगितले आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
एकनाथ शिंदे विधिमंडळ नेते झाले होते. पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्याबरोबर बसलेले आहेत ते अजित पवार आणि इतर सहकारी तसेच ज्यांनी परवा सत्कार केला ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सर्वांची भूमिका होती. एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही. फार ज्युनिअर आहेत. त्यांच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाही त्यांनी जर शब्द पाळला असता 50-50 चा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. प्रश्नच येत नव्हता कोणाला पुढे आणण्याचा. उद्धव ठाकरे त्या बाबतीत प्रामाणिक आहेत. भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला.