विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना रविवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यांना दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथून ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी हरियाणातील सोनिपत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अली खान यांच्यावर दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यांची राय पोलीस स्टेशन, सोनिपत येथे चौकशी सुरू असून, न्यायालयात हजर करून त्यांना रिमांडवर घेण्यात येणार आहे.
या प्रकरणात हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. आयोगाने अली खान यांना समन्स बजावले होते. मात्र ते आयोगासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे आयोगाने कठोर भूमिका घेत एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भात सोनिपतचे डीसीपी नरेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “महिला आयोगाच्या तक्रारीनुसार प्रकरण गांभीर्याने घेतले गेले असून, सोशल मीडियावर देशविरोधी वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अली खान यांना अटक करण्यात आली आहे.
अशोका विद्यापीठाने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, “प्रा. अली खान महमूदाबाद यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत आहोत. विद्यापीठ पोलिस व स्थानिक प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करेल.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्यात एक नेपाळी नागरिकही होता. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करत सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटले की, “ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधातील लढ्यातील एक नवा टप्पा आहे. २०१६ मधील सर्जिकल स्ट्राइक आणि २०१९ मधील एअर स्ट्राइकनंतर हे भारताचे स्पष्ट धोरण अधोरेखित करणारे तिसरे महत्त्वाचे पाऊल आहे.”
प्रा. अली खान यांनी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याचा आरोप आहे. या पोस्टमध्ये कथितपणे ऑपरेशनला “राजकीय स्टंट” म्हणत भारतीय कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेकांकडून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.
Ashoka University professor Ali Khan Mahmudabad arrested; action taken due to controversial post on ‘Operation Sindoor’
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर