विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे जवान सीमारेषेवर बलिदान देत असताना त्यांना युद्धबंदीचे आदेश स्वतःच्या देशाच्या पंतप्रधानांकडून नव्हे, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडून मिळतात, हे आपल्या सार्वभौमत्वावरच प्रश्न निर्माण करणारे आहे. हे सरकार किती आत्मनिर्भर आहे यावरच शंका येते, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान केली. Praniti Shinde
देशाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाबींवर थेट सवाल उपस्थित करत सरकारवर बेपर्वाईचे आरोप करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, “ऑपरेशन सिंदूर किती यशस्वी ठरले? त्यातून नक्की काय मिळाले? किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला? याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Praniti Shinde
याप्रकरणातील दोषींना अद्याप अटक न झाल्याचे सांगताना हल्ल्याचे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरत असताना सरकार मात्र प्रचारसभांमध्ये मग्न आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
पाकिस्तानला हल्ल्याची माहिती आगोदरच मिळाली होती. आणि आपली काही लढाऊ विमाने हरवली गेल्याचेही सरकार मान्य करत नाही. ही माहिती लपवण्यामागे नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, दहशतवादी हल्ल्यांचा वापर भाजप निवडणुकीपूर्वी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी करतो.
पंतप्रधान मोदी यांच्यावरही वैयक्तिक टीका करत शिंदे म्हणाल्या, “जवांनांच्या शवावरून अजून धुर निघत असतानाच पंतप्रधान बिहारमध्ये राजकीय सभा घेत होते. इतकी असंवेदनशीलता दुर्दैवी आहे.आपले जवळचे शेजारी भूतान, नेपाळ, श्रीलंका हे सर्व आता चीनशी हातमिळवणी करत आहेत. आपली सामरिक आणि राजनैतिक धोरणं इतकी दुर्बल झाली आहेत की, आपण एकटे पडत चाललो आहोत.
“देशात आर्थिक अस्थिरता, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. पण पंतप्रधान मात्र परदेश दौऱ्यांमध्ये रममाण असून केवळ प्रवासी भारतीयांबरोबर फोटो काढत असतात. हा ‘फोटोशूटप्रधान’ देश बनवण्याचा प्रकार आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली.
“या सरकारला कोणतेही प्रश्न सहन होत नाहीत. जो कोणी प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवले जाते. पारदर्शकता नाही, जबाबदारी नाही, फक्त प्रचार आणि प्रसिद्धी यावरच भर आहे,” अशा शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला.