D. K. Shivakumar कर्नाटकात सिद्धरामय्या यांचे स्थान बळकट, डी. के. शिवकुमार वेटिंगवरच

D. K. Shivakumar कर्नाटकात सिद्धरामय्या यांचे स्थान बळकट, डी. के. शिवकुमार वेटिंगवरच

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : म्हैसूर येथील भूखंड प्रकरणावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची चौकशी सुरू आहे. कर्नाटक काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला काहीही मिळणार नाही असा अंदाज होता. त्यामुळे काँग्रेसचे रणनीतीकार डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री पदाच्या आशेवर होते. मात्र पोटनिवडणुकीतील तीनही जागा जिंकल्याने सिद्धरामय्या यांचे पद आणखी बळकट झाले आहे.

कर्नाटकात तीन जागांवर जरी पोटनिवडणूक झाली होती. या तीन जागा जिंकण्यामुळे सत्तेची समीकरणे बदलणार नव्हती, तरीही त्या ज्या परिस्थितीत जिंकल्या, त्या परिस्थितीला महत्त्व होते. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी त्यांचा नातू निखिल कुमारस्वामी यांना चन्नापटना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन राजकीय कारकीर्दीला उजाळा देण्याचा शेवटचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या या पराभवामुळे धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही. ३६ वर्षीय अभिनेता-राजकारणी निखिल कुमारस्वामी यांचा पाच वर्षांतील हा तिसरा पराभव आहे.

२०१९ मध्ये मंड्या लोकसभेची जागा आणि २०२३ मध्ये रामनगर विधानसभेची जागा गमावल्यानंतर, निखिल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी योगेश्वर यांच्याकडून २५ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. योगेश्वर यांना भाजपने लोकसभेचे तिकीट देण्यास नकार दिल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ही जागा जिंकली. या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. चन्नापटना तसेच सांडूर आणि शिगगाव येथे झालेल्या तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. या निकालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ‘मुडा’ जमीन वाटप घोटाळा आणि कुटुंबावरील आरोप यासारख्या अनेक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागत आहे. लोकायुक्त आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सिद्धरामय्या आणि त्याच्या कुटुंबाविरुद्धच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. असे असले, तरी जनतेच्या न्यायालयात आपल्याला निकाल मिळाला, असे सांगायला ते मोकळे झाले.

चन्नापटनामध्ये काँग्रेसच्या विजयाचे श्रेय उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांना दिले जात आहे. योगेश्वर यांना भाजपमधून काँग्रेसमध्ये आणण्यात आणि कुमारस्वामी यांचा प्रभाव कमी करण्यात या दोघांचीही विशेष भूमिका आहे. हे पाऊल कुमारस्वामी यांनी नुकत्याच झालेल्या भाजप-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या युतीमध्ये घेतलेल्या भूमिकेला दिलेली प्रतिक्रिया होती. या आघाडीने केवळ कुमारस्वामी यांना मंड्यातून लोकसभेत पाठवले नाही, तर त्यांचे मेहुणे डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनाही डी. के. सुरेश यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजयी केले होते. कुमारस्वामी मंड्यातून खासदार झाल्याने आणि त्यांना मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री बनवल्याने भाजपच्या प्रदेश नेत्यांमध्ये असंतोष होता. असे असतानाही चन्नापटणा पोटनिवडणुकीच्या तिकीट वाटपात स्थानिक भाजप नेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

निखिल कुमारस्वामी यांना चन्नापटना मतदारसंघातून उमेदवार करण्याचा निर्णय गौडा कुटुंबाने घेतला, जो भाजपसाठी घातक ठरला. एचडी देवेगौडा यांनी सात दिवस प्रचार केला आणि वय आणि आरोग्याची पर्वा न करता २५ हून अधिक सभांना संबोधित केले. निखिलला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले; मात्र त्यांचे आवाहन निष्फळ ठरले. देवेगौडा यांचे इतर नातू, प्रज्वल रेवन्ना आणि सूरज रेवन्ना हे आधीच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वादात अडकले आहेत. त्यामुळे देवेगौडा यांना निखिल यांच्या माध्यमातून धर्म निरपेक्ष जनता दलाचे भविष्य सुरक्षित करायचे होते; पण हा प्रयत्नही फसला.

शिगगावमध्ये भाजपने माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पुत्र भरत बोम्मई यांना उमेदवारी दिली; परंतु त्यांचा काँग्रेसच्या यासिर पठाण यांच्याकडून १३ हजार मतांनी पराभव झाला. १९९४ पासून भाजपने ही जागा गमावलेली नव्हती. सांदूरमध्ये काँग्रेसच्या अन्नपूर्णा तुकाराम यांनी भाजपच्या बंगारू हनुमंथू यांचा नऊ हजार मतांनी पराभव केला. बेलारीमधून लोकसभेत निवडून आल्यानंतर तुकारामांनी ही जागा सोडली होती. कर्नाटक भाजपच्या सततच्या अपयशाने पक्षाची कमजोरी उघड झाली आहे. गटबाजी ही पक्षासाठी मोठी समस्या बनली आहे. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर लगेचच भाजप नेते बसनागौडा पाटील यत्नल यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांना पराभवासाठी जबाबदार धरले. यत्नल आणि रमेश जारकीहोळी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी विजयेंद्र यांचा निषेध केला आणि काँग्रेस सरकारच्या विरोधात स्वतंत्र सभा आयोजित केल्या. विजयेंद्र हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे चिरंजीव आहेत.

निखिल यांच्या विरोधात जिंकलेलेल सीपी योगेश्वर यापूर्वी पाच वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी यापूर्वी काँग्रेस, भाजप, अपक्ष आणि समाजवादी पक्षाच्या तिकीटावर चैनपटना येथून विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांची प्रतिमा लढवय्या नेत्याची आहे आणि विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमधून आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डी. के. शिवकुमार यांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेचा प्रश्न बनवली होती. त्यांचे भाऊ डी. के. सुरेश यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला डी. के. शिवकुमार यांनी कुमारस्वामी यांना जबाबदार धरले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही कुमारस्वामींना धडा शिकवायचा होता. शिगाव हा लिंगायतबहुल विधानसभा मतदारसंघ आहे. भाजप नेते बसवराज बोम्मई यांचे पुत्र भरत बोम्मई यांना येथून तिकीट देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. भरत ३० वर्षांचे आहेत. ते विजयी झाले, तर भाजपच्या इतर कार्यकर्त्यांना पुढे कधीच संधी मिळणार नाही, असे वाटल्याने भाजपचे कार्यकर्ते दूर राहिले.

बसन गौड पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ लिंगायत नेत्याने या विचारसरणीला खतपाणी घातले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिती रवी यांनी पोटनिवडणुकीतील पराभव पक्षातील अंतर्गत कलहामुळे झाल्याचे मान्य केले. बेल्लारी येथील सांदूर विधानसभेसाठी काँग्रेसने खासदार ई तुकाराम यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांना तिकीट दिले आणि त्या विजयी झाल्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पक्षाचा विजय कार्यकर्त्यांना समर्पित आहे आणि भाजपच्या अपप्रचाराचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत, असे मत व्यक्त केले. कर्नाटकातील भाजपच्या येदियुरप्पा विरोधी गटाला त्यांचा मुलगा बी. वाय. विजेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदी राहू द्यायचे नाही. त्यामुळे ज्येष्ठ लिंगायत नेते बसन गौड पाटील यत्नाल आणि दलित नेते रमेश झारकीहोळी यांनी उघड बंडखोरी केली. बी.वाय.विजेंद्र यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांना पक्षांतर्गत वादाबाबत इशारा दिल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या यांच्याबाबत कर्नाटकात भाजप चांगलाच आक्रमक होता. विजेंद्रपासून काँग्रेस पक्षांतर्गत सिद्धरामय्या यांचे मुख्यमंत्री म्हणून दिवस मर्यादित असल्याची अटकळ होती; मात्र पोटनिवडणुकीच्या निकालाने त्यांची स्थिती सुधारली आहे.

Siddaramaiah’s position strengthened in Karnataka, D. K. Shivakumar on waiting

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023