विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला. त्याचबरोबर अमेरिका व चीनच्या अन्यायकारक व्यापार पद्धतींवरही त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.
जयशंकर म्हणाले, “आपले हक्क मांडताना धोक्यांना सामोरे जाणे गरजेचे आहे. दहशतवादाविरुद्धची लढाई ही आपली प्राधान्याची आहे, कारण यात कट्टरता, हिंसा, असहिष्णुता व भीती यांचा संगम आहे. भारताला स्वातंत्र्यानंतरपासूनच अशा शेजाऱ्याचा सामना करावा लागतो, जो जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे.”
परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले की, “गेल्या अनेक दशकांपासून जगातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मागोवा घेतला, की तो एकाच देशाशी जोडलेला दिसतो. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीतही अशा देशातील नागरिकांचा भरणा आहे. या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम येथे निरपराध पर्यटकांची झालेली हत्या ही सीमापार रानटीपणाचे ताजे उदाहरण आहे. भारताने आपले नागरिक वाचवण्याचा हक्क बजावला आणि या हल्ल्याचे आयोजक व गुन्हेगारांना न्यायालयात उभे केले.”
जयशंकर यांनी इशारा की, “दहशतवाद ही सर्वांची समस्या आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक सखोल असले पाहिजे. जेव्हा एखादा देश उघडपणे दहशतवादाला राज्यनीती म्हणून स्वीकारतो, जेव्हा मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारखाने उभे राहतात, आणि जेव्हा दहशतवाद्यांचा गौरव केला जातो, तेव्हा अशा कृतींचा जागतिक स्तरावर तीव्र निषेध होणे आवश्यक आहे.”
जयशंकर म्हणाले, “दहशतवादी वित्तपुरवठा थांबवणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांवर निर्बंध घालतानाच संपूर्ण दहशतवादी यंत्रणेवर सातत्याने दबाव ठेवला पाहिजे. जे राष्ट्र दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना मूकसंमती देतात, त्यांना शेवटी त्याचाच फटका बसणार आहे.”
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला आणि चीनलाही लक्ष्य केले. त्यांनी मनमानी टॅरिफ वाढ, तंत्रज्ञानावरील निर्बंध आणि पुरवठा साखळ्यांवरील दबावयुक्त धोरणांवर प्रहार केला.
ते म्हणाले, “जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश, एक प्राचीन संस्कृती असलेले राष्ट्र आणि जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आम्हाला आमची ओळख ठाऊक आहे. भारत नेहमीच स्वतंत्र निर्णय घेईल आणि ग्लोबल साऊथमधील आवाज ठरेल.”
जयशंकर म्हणाले, “संपन्न समाजांनी नेहमीच पहिली संधी आपल्यासाठी राखून ठेवली. संसाधनांच्या टंचाईत असलेले देश जगण्यासाठी झगडले, आणि नंतर त्यांनाच तथाकथित नैतिक भाषणं ऐकावी लागली. व्यापाराच्या बाबतीत गैर-बाजार पद्धतींनी नियम व व्यवस्थांचा गैरफायदा घेतला.”
“आज परिस्थिती अशी झाली आहे की, बाजारपेठांमध्ये टॅरिफ अस्थिरता, अनिश्चित प्रवेश आणि मर्यादित पुरवठा स्रोत यामुळे धोका कमी करणे (de-risking) ही जगभरातील राष्ट्रांसाठी अनिवार्य गोष्ट झाली आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
External Affairs Minister S. Jaishankar slams Pakistan at UN; also slams US and China
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…




















