विशेष प्रतिनिधी
चंदीगड : Mohammad Mustafa पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी, माजी मंत्री रझिया सुलताना तसेच मुलगी यांच्या विरोधात त्यांच्या मुलगा आकिल अख्तरच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 103(1) (खून) आणि कलम 61 (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पंजाबच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.Mohammad Mustafa
ही कारवाई आकिल अख्तरच्या मृत्यूनंतर करण्यात आली. आकिल (वय 35) हा मुस्तफा दाम्पत्याचा मुलगा असून, काही दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह पंचकूला येथील राहत्या घरात आढळला होता. मृत्यूपूर्वी आकिलने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यात त्याने आपल्या वडिलांवर आणि पत्नीवर गंभीर आरोप केले होते. त्याने व्हिडिओमध्ये म्हटले होते की, “माझ्या वडिलांचे माझ्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध आहेत. माझी आई आणि बहीण मला छळत आहेत. माझा जीव धोक्यात आहे.”Mohammad Mustafa
या व्हिडिओनंतर आकिलच्या मृत्यूला खूनाचा रंग दिला जाऊ लागला. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आणि त्यानंतर मोहम्मद मुस्तफा, रझिया सुलताना आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा नोंदवण्यात आला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मोहम्मद मुस्तफा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. “एफआयआर नोंद झाली म्हणजे आम्ही दोषी ठरलो असा अर्थ नाही. हा कायद्याचा एक भाग आहे. सत्य बाहेर येईल आणि आम्ही निर्दोष ठरू,” असे त्यांनी सांगितले. मुस्तफा यांनी दावा केला की त्यांचा मुलगा आकिल काही काळापासून मानसिक ताणाखाली आणि व्यसनाधीन अवस्थेत होता. “तो अनेकदा रिहॅब सेंटरमध्ये दाखल झाला होता. मानसिक अस्थिरतेमुळे त्याने चुकीचे आरोप केले असावेत,” असे मुस्तफा म्हणाले.
दरम्यान, पोलीस उपआयुक्त श्रीष्टी गुप्ता यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. तपास पथक आकिलचा मृत्यूपूर्व व्हिडिओ, त्याच्या आरोग्यविषयक कागदपत्रे, आणि पुनर्वसन केंद्रातील नोंदींचा सखोल अभ्यास करत आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत.
या प्रकरणाने पंजाबमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे, कारण रझिया सुलताना या काँग्रेस सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री राहिल्या आहेत. विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत “कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत” अशी मागणी केली आहे.
दरम्यान, सामाजिक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पोलिस तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा, तसेच आकिल अख्तरच्या मृत्यूमागील सर्व अंगांचा नीट शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या सुरु असून, पोलिसांनी मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी फॉरेन्सिक आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत या खळबळजनक प्रकरणाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
Former Punjab DGP Mohammad Mustafa, former minister wife and daughter booked for murder in son’s death
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..