विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारताच्या काही निर्यात वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा इशारा दिल्यानंतर भारत सरकारने त्याची दखल घेतली असून या निर्णयाच्या परिणामांचा अभ्यास सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय हितासाठी सर्व उपाय करणार, असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून परस्पर हिताचे, न्याय्य आणि संतुलित द्विपक्षीय व्यापार करार अंतिम करण्यासाठी चर्चा सुरू आहे. भारत या उद्दिष्टासाठी कटिबद्ध आहे.“शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) यांचे हित जपणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याआधी युकेसोबत झालेल्या समावेशक व्यापार कराराप्रमाणेच सरकार राष्ट्रीय हितासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भारतावर अनेक आरोप केले. त्यांनी लिहिले की, “अमेरिकेचा भारताशी मोठा व्यापार तूट आहे. भारतातील उंच टॅरिफ आणि त्रासदायक अप्रत्यक्ष व्यापार अडथळ्यांमुळे अमेरिकेने भारतासोबत फारसा व्यापार केला नाही.” रशियाशी भारताचे सैनिकी उपकरण आणि ऊर्जा खरेदी व्यवहार सुरू असल्यावर टीका केली आणि हा प्रकार “चांगला नाही” असे म्हटले.
एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २७ टक्क्यांपर्यंत नव्या टॅरिफची घोषणा केली होती. मात्र, नंतर हा निर्णय थांबवण्यात आला होता आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू होती.