भारतीय सैन्याला फ्रीहँड दिला आहे, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा सीजफायर तोडल्यानंतर पाकिस्तानला इशारा Vikram Misri
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून सीजफायर कराराचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय सैन्य तत्काळ प्रत्युत्तर देत असून, सीमाभागातील अतिक्रमणाचा सामना करत आहे. हे अतिक्रमण अत्यंत निषेधार्ह असून त्याची जबाबदारी पाकिस्तानवरच आहे. आम्ही सैन्याला फ्रीहँड दिला. आहे, असा इशारा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात संध्याकाळी 5 वाजता युद्धविराम झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत, सायंकाळी 8 वाजता पाकिस्तानने पुन्हा सीजफायरचे उल्लंघन करत जम्मू-कश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या सीमांवर शेलिंग आणि ड्रोन हल्ले सुरू केले. यावर प्रतिक्रिया देत रात्री 11 वाजता भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला कडक इशारा दिला.
ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही भारतीय सैन्याला फ्रीहँड दिला आहे. ही परिस्थिती पाकिस्तानने गांभीर्याने घ्यावी आणि अतिक्रमण थांबवण्यासाठी योग्य पावले उचलावीत. सैन्याला कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
शनिवारी सायंकाळी संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत लष्करातून कर्नल सोफिया कुरेशी, हवाई दलातून विंग कमांडर व्योमिका सिंग आणि नौदलातून कमोडोर रघु आर. नायर सहभागी होते.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले, पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जात आहे. त्यांनी दावा केला की त्यांनी भारतीय एस-400 आणि ब्रह्मोस मिसाईल बेस उध्वस्त केला आहे, जे पूर्णपणे खोटे आहे. तसेच सिरसा, पठाणकोट, जम्मू, भुज येथील हवाई तळांवर हल्ल्याचे दावेही चुकीचे आहेत.
तसेच पाकिस्तानकडून चंदीगड आणि ब्यासमधील शस्त्रागारांवर हल्ल्याचे दावेही खोटे ठरले आहेत. या सर्व लष्करी स्थळांना कोणतीही इजा झालेली नाही. पाकिस्तानने भारताने मशिदींना हानी पोहोचवली असा खोटा प्रचार केला आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आमच्या सैन्याची मूल्ये याचे उदाहरण आहेत,” असं कुरेशी यांनी स्पष्ट केलं.
भारतीय लष्कराने स्कर्दू, जकोबाबाद, सरगोधा आणि बुलारी या पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले करत त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टम, रडार्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरला गंभीर नुकसान पोहोचवलं आहे. एलओसीजवळील पाकिस्तानचे लॉजिस्टिक बेस, कमांड अँड कंट्रोल युनिट्स आणि सैन्यसाठ्यावरही लक्ष केंद्रीत करत पाकिस्तानची आक्रमण आणि संरक्षण क्षमता खिळखिळी केली आहे.
कमोडोर नायर यांनी सांगितले की, भारतीय लष्कर सतर्क आहे. जर पुन्हा हल्ला झाला, तर आम्ही त्याला मुंहतोड प्रत्युत्तर देऊ. देशाची सार्वभौमता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी आमच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत.”