विशेष प्रतिनिधी
अमरावती: तामिळनाडू हिंदीला सातत्याने नाकारत असतानाही तिथले चित्रपट हिंदीत डब करून उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगडसारख्या हिंदी भाषिक राज्यांमधून पैसे का कमवतात, असा सवाल आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी केला आहे.
तामिळनाडूच्या हिंदीविरोधी भूमिकेवर तीव्र टीका त्यांनी केली. केंद्र सरकार दक्षिण भारतावर हिंदी लादत असल्याच्या आरोपावरून सुरू असलेल्या राजकीय वादात उडी घेत तामिळनाडूची भूमिका विरोधाभासी असल्याचे म्हटले.जनसेना पक्षाच्या स्थापना दिनी भाषण करताना ते म्हणाले की, जेव्हा आम्ही काही बोलतो, तेव्हा ते आम्हाला संस्कृतचा अपमान करणारे म्हणतात. ते सांगतात की हिंदी आम्हावर लादली जात आहे.
पण सर्व भारतीय भाषा आपल्या संस्कृतीचाच भाग नाहीत का?”तामिळनाडू सतत हिंदीला विरोध करतं आणि म्हणतं की आम्हाला ती नकोय. पण मग त्यांनी हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी चित्रपट हिंदीत डब करणे थांबवावे. त्यांना बिहारमधून कामगार लागतात, त्यांना हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून पैसेही मिळतात, पण तरीही ते हिंदीला नाकारतात. हे कसं न्याय्य आहे?”
आपल्या वैयक्तिक अनुभवांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षण घेत असताना त्यांना चेन्नईत भेदभावाला सामोरे जावे लागले असेही त्यांनी सांगितले
भारत म्हणजे केक आहे का, जो कोणीही रागाच्या भरात तोडू पाहेल? जर कोणी भारताच्या अखंडतेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर माझ्यासारखे कोट्यवधी लोक त्याला रोखण्यासाठी उभे राहतील,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.



















