विशेष प्रतिनिधी
मुंबई: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी शिवरायांच्या जन्मदिनी त्यांना ‘श्रद्धांजली अर्पण करतो’ असा उल्लेख या पोस्टमध्ये केल्याने त्यांच्यावर संताप व्यक्त होत आहे.
राहुल गांधींनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील.”सामान्यपणे जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आदरांजली असा उल्लेख केला जातो.
राहुल गांधींनी शिवजयंती दिवशी शिवरायांनी श्रद्धांजली वाहिल्याने भाजपकडून सडकून टीका होत आहे. देशभरात 395 वी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. मात्र राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धाजली वाहिल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, औरंगजेबाच्या पिल्लावळीकडून आणखीन काही अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत, औरंगजेबाच्या विचारावरती हे राजकारण करतात. नेहमी आमच्या शिवरायांचा यांना द्वेषच दिसणार. राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे
भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. राहुल गांधींनी ही पोस्ट डिलीट केली नाही तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असं भातखळकरांनी म्हटले आहे. महापुरुषांच्या बाबतीत असा खोडसाळपणा खपवून घेतला जाणार नाही असे भातखळकर म्हणाले.