विशेष प्रतिनिधी
पनवेल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपानंतर जणू त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक नेत्यांनी असे आरोप सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदार संघात मतचोरीचा उच्चांक घडल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याने केला आहे. Rahul Gandhi
शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांनी 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर बाळाराम पाटील यांनी आपल्या मतदारसंघात मतचोरीचा उच्चांक झाल्याचा थेट आरोप केला आहे. पनवेल मतदारसंघात मतचोरीचा उच्चांक झाला आहे. याठिकाणी 85,211 दुबार मतदार आहेत. त्यापैकी 11600 जणांनी दोनदा मतदान केले. या प्रकरणी हायकोर्टाने नावे वगळण्याचा आदेश दिला तरी, अधिकारी निष्क्रिय आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
बाळाराम पाटील म्हणाले, आज देशात सर्वत्र मतचोरीचा मुद्दा गाजत आहे. या मतचोरीचा उच्चांक आमच्या 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात झाला आहे. या मतदारसंघात तब्बल 85 हजार 211 नावे ही दुबार मतदारांची नोंदलेली आहेत. त्यापैकी 25 हजार 855 हे पनवेल मतदारसंघात दोनवेळा नाव असलेले मतदार आहेत. पनवेल आणि उरण या दोन्ही ठिकाणी नावे असलेले 27 हजार 275 मतदार आहेत. ऐरोली या मतदारसंघात नाव असलेले 16 हजार 96 मतदार आहेत. आणि पनवेल व बेलापूर अशी डबल नावे असणारे 15 हजार 397 मतदार आहेत.
580-88 मतदारांचा कुठेही थांगपत्ता लागत नाही. एकूण 85 हजार 211 दुबार मतदार सापडल्यानंतर आम्ही त्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांच्याकडे या प्रकरणी कारवाई करण्याचा आग्रह धरला. 10 सप्टेंबर 2024 रोजी आम्ही ही तक्रार केली होती. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2024 रोजी आम्ही मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केली. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने नावे वगळण्याचा आदेश दिला. पण त्यानंतरही अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असे पाटील यांनी लोकशाहीची हत्या थांबवण्याचे आवाहन करताना म्हटले आहे.