विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत लोकसभेत काँग्रेस सैन्यदलाच्या शौर्यावर शंका घेत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मनीष तिवारी यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. लोकसभेत बोलू दिले नसल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं. जय हिंद!” अशा शब्दांत त्यांनी पक्षाला सुनावले आहे.
सोमवारी तिवारी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये थरूर आणि त्यांना बोलू का दिले गेले नाही हे स्पष्ट केले होते. तिवारी यांनी “पूरब और पश्चिम” चित्रपटातील देशभक्तीपर गाण्याचे कॅप्शन देखील दिले: “भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं. जय हिंद!”
यापूर्वी, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेण्याचा प्रश्न टाळला होता. त्यांनी माध्यमांना सांगितले, ‘मौनव्रत…मौनव्रत.’
ऑपरेशन सिंदूरवर भारताची बाजू मांडण्यासाठी काँग्रेस खासदार मनीष तिवारी आणि शशी थरूर परदेश दौऱ्यावर गेले होते. थरूर यांनी जगातील विविध देशांमध्ये पाठवलेल्या सात शिष्टमंडळांपैकी एकाचे नेतृत्व केले. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्यावर राग आहे.
काँग्रेसच्या एका खासदाराने म्हटले आहे की, थरूर आणि तिवारींसारखे नेते परदेशात सरकारच्या समर्थनार्थ बोलले आहेत म्हणून पक्षाने जाणूनबुजून नवीन खासदारांना संधी दिली. आता पक्षाला असे वाटते की संसदेत सरकारवर टीका व्हावी आणि विरोधी पक्षाचा आवाज समोर यावा. म्हणूनच, अशा नेत्यांची निवड करण्यात आली जे पूर्णपणे पक्षाच्या मार्गावर आहेत.शशी थरूर आणि मनीष तिवारींसारखे नेते अनेकदा त्यांचे वेगवेगळे विचार व्यक्त करतात. जेव्हा ते परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करत होते, तेव्हा त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि सर्जिकल स्ट्राईक सारख्या मुद्द्यांवर सरकारचे कौतुक केले.
काँग्रेसला भीती होती की हे नेते संसदेत सरकारची बाजू जोरदारपणे मांडू शकतील त्यामुळे काँग्रेसचा सरकारवर टीका करण्याचा दब हाणून पडला जाईल. त्यामुळे काँग्रेसने त्यांना चर्चेपासून दूर ठेवले आणि त्यांच्या जागी अशा नेत्यांची निवड केली जे पूर्णपणे पक्षाच्या सुरात बोलतील.
तिवारी आणि थरूर हे दोन्ही नेते उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यामुळे मोदी सरकारने परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळात दोघांची निवड केली होती. मात्र त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी X वर लिहिले की, ‘शुक्रवारी सकाळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळासाठी ४ खासदारांची नावे मागितली होती. काँग्रेसने आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांची नावे दिली होती.’
भारतात परतल्यानंतरही थरूर आणि काँग्रेसमधील संबंध सुधारले नाहीत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थरूर यांचे नाव न घेता म्हटले होते की काही लोकांसाठी मोदी आधी येतात आणि देश नंतर. खरगे यांचे विधान थरूर यांच्या सरकारकडे असलेल्या कलांबद्दल होते.
दुसरीकडे, शशी थरूर यांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले होते. त्यांनी X वर लिहिले होते की, ‘अलीकडील घटनांबद्दल आपल्या देशाचे मत मांडण्यासाठी पाच प्रमुख देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचे भारत सरकारचे आमंत्रण मिळाल्याने मला सन्मानित वाटत आहे. जेव्हा राष्ट्रीय हिताचा आणि माझ्या सेवांची आवश्यकता असेल तेव्हा मी मागे राहणार नाही.’