विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बोलताना विचार केला नाहीत ना, मग आता परिणामही भोगा, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशमधील आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांना सुनावले आहेत. कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचे आदेशही दिले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत मध्य प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील विजय शहा यांना फटकारले आहे. त्यांचा माफीनामा स्वीकारण्यासही नकार दिला.
विजय शहा यांच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. यात मध्य प्रदेशच्या बाहेरील एका महिला अधिकाऱ्यासह तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा यात समावेश असेल. 28 मे पर्यंत त्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यानही सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना खडे बोल सुनावले. तसेच त्यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला. मंत्र्यांनी मागितलेली माफी आम्हाला मान्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती आहात. अनुभवी राजकीय नेते आहात. अशा वेळी तुम्ही बोलताना विचार करायला हवा. आपल्याला जबाबदारीचे भान हवे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. बोलताना विचार केला नाहीत ना, मग आता परिणामही भोगा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शहा यांना त्यांच्या वक्तव्यावरून फटकारल्यानंतर शहा यांच्या वकिलांनी त्यांनी माफी मागितल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरही न्यायालयाने त्यांना फटकारले. न्या. सूर्यकांत यांनी विचारणा केली की, माफी अशी मागतात का? काहीतरी भान बाळगून आणि जबाबदारीने बोलायला हवे. अशा पद्धतीने मागितलेली माफी कुठे आहे. तुम्ही कशाप्रकारे माफी मागितली? कोणत्याही माफीचा काही न काही अर्थ असतो. काहींना खरोखर वागल्या-बोलल्याचा पश्चात्ताप असतो त्यामुळे ते अत्यंत प्रामाणिकपणे माफी मागतात. तर काही केवळ मगरीसारखे खोटे अश्रू दाखवतात. तुमची माफी यातील कोणत्या प्रकारात मोडते, असा थेट सवाल न्यायालयाने केला.
तुम्हाला न्यायालयाने माफी मागायला सांगितल्यावर तुम्ही माफी मागितली आहे. पण, तुमच्या चुकीच्या वक्तव्यावर प्रामाणिकपणे माफी मागायला तुम्हाला कोणी अडवले होते का, असा सवाल न्यायालयाने केला. यासोबतच, मध्य प्रदेश सरकारने याप्रकरणी काय कारवाई केली, अशी विचारणाही न्यायालयाने केली आहे.
Supreme Court says harsh words to Madhya Pradesh Minister Vijay Shah
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर