विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे गटाने ‘शिवसेना’ (Shiv Sena) या पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ या चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची तातडीने सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मंगळवारी ही मागणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने नुकतेच दिले आहेत. अशा परिस्थितीत, ग्रामीण भागात मतदारांना पक्षचिन्ह ओळखण्यात अडचण होऊ शकते, हे लक्षात घेता या प्रकरणाची सुनावणी उन्हाळी सुट्यांदरम्यानच घ्यावी, अशी विनंती सिब्बल यांनी केली. सिब्बल यांनी युक्तिवादासाठी केवळ 20 मिनिटांचा वेळ लागेल, असे कोर्टाला सांगितले.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शहरी भागात ही समस्या नसेल, पण ग्रामीण मतदारांसाठी ही बाब खरोखरच महत्त्वाची ठरू शकते.”
उद्धव ठाकरे गटाने ही याचिका निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केली आहे. 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह देण्यात आले होते. याविरोधात ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे.
कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात 2023 मधील संविधान खंडपीठाच्या निर्णयाचा दाखला दिला. त्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते की, विधिमंडळातील संख्याबळ हे कोणता गट खरा पक्ष आहे, याचा निकष असू शकत नाही. मात्र, निवडणूक आयोगाने याच आधारावर शिंदे गटाला मान्यता दिली, असा आरोप सिब्बल यांनी केला.
तसेच, आयोगाने पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचा आणि गटाचा आवाज दुर्लक्षित केला आणि फक्त विधायकी समर्थनाच्या आधारे निर्णय घेतला, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. आयोगाने परिच्छेद 15 अंतर्गत आपले मध्यस्थीचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडले नाही आणि आपली संवैधानिक भूमिका दुर्बळ केली, असा ठपकाही ठाकरे गटाने ठेवला आहे.
ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रतीक्षेत आहे.
Thackeray fraction demands immediate hearing on Shiv Sena party name and symbol dispute
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत