विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दहशतवादविरोधी मोहीमेत भारताच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण समर्थन देऊ, अशी ग्वाही संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) मंत्र्यांनी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला दिली.
केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरविषयीची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अबुधाबी येथे यूएईच्या मंत्र्यांसोबत चर्चा केली.
सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी अबूधाबी येथे दाखल झाले. यूएई सरकारचे प्रतिनिधी महामहिम अहमद मीर खोरी आणि भारताचे राजदूत संजय सुधीर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यूएई फेडरल नॅशनल काउंसिलचे संरक्षण आणि अंतर्गत व परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डॉ. अली रशीद अल नुओमी व यूएईचे मंत्री शेख नह्यान मबारक अल नह्यान यांची भेट घेतली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहीमेची माहिती दिली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दहशतवादविरोधी मोहीमेत यूएई पूर्ण ताकदीनिशी भारतासोबत आहे, अशी ग्वाही दोन्ही मंत्र्यांनी दिली. भारत आणि यूएई हे दोन्ही देश चांगले मित्र आहेत. पहलगाम हल्ल्याचा सर्वात आधी यूएईकडून निषेध करण्यात आला होता. शिष्टमंडळाने यूएईच्या खासदारांना भारताची दहशतवादविरोधी भूमिका पटवून दिली. पहलगामचा हल्ला हा केवळ भारतावरचा हल्ला नाही तर मानवतेवरचा हल्ला आहे. या हल्ल्याचा यूएईच्या खासदारांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
भारत आणि यूएई यांच्यातील संबंध केवळ व्दिपक्षीय व्यापारापुरता नसून दोन्ही देशांत सांस्कृतिक देवाणघेवाण होत आहे. यूएईमध्ये मंदिरं उभारली जात आहेत. मोठ्या संख्येने भारतीय यूएईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे दोन्ही देशांनी दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत थारा द्यायचा नाही, अशी भूमिका घेतल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने या बैठकीत पाकिस्तानमधून चालू असलेल्या दहशतवादी कारवायांच्या धोक्यांविषयी उपस्थितांचे लक्ष वेधले. ऑपरेशन सिंदूर ही कारवाई भारताने पाहीलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिशोधासाठी सुरू केली होती. यामध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. पाकिस्तानच्या आक्रमकतेला भारतीय सैन्याने योग्य उत्तर दिलं आणि त्यांच्या हवाई तळांवर जोरदार कारवाई केली.
ऑपरेशन सिंदूर ही न्यायासाठी घेतलेली नवीन प्रतिज्ञा आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्पष्ट सांगितले आहे की, “दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही; भारत चर्चा करेल तेव्हा ती फक्त पाकिस्तानव्याप्त काश्मीरवरच होईल, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ ‘यूएई’नंतर काँगो, लायबेरिया आणि सीएरा लिओन या देशांना भेट देणार आहे. शिष्टमंडळाकडून सीमापार दहशतवादाच्या आव्हानांचा सामना आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी धोरणांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलखोल केली जाणार आहे. या शिष्टमंडळामध्ये श्री. मनन कुमार मिश्रा, डॉ. सस्मित पात्रा, श्री. ई. टी. मोहम्मद बशीर, श्री. एस. एस. आहलुवालिया, श्री. अतुल गर्ग, श्रीमती. बांसुरी स्वराज आणि राजदूत सुजन आर. चिनॉय या मान्यवरांचा समावेश आहे. Shrikant Shinde
United Arab Emirates supports India in anti-terrorism campaign, says Shrikant Shinde
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर