विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. पण कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत पवार यांनी मुंडे यांना अभय दिले आहे.
अजित पवार म्हणाले, दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली आहेत. मी ती घेतली पाहिली. मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो. पण त्यांना नागपूरला जायचं असल्यानं मी त्यांना आत्ताच भेटलो. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जशा दमानिया भेटल्या तशा त्या मलाही भेटल्या. मलाही त्यांनी काही कागदपत्रं दिले आहेत. या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहेत. एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन. ही कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत. कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते, म्हणून ते सीआयडी आणि एसआयटीकडे देण्यात आले आहेत. जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल.
मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीपासूनच सांगितलं. जी घटना सरपंचांच्याबाबत बीड जिल्ह्यात घडली. त्याची चौकशी सुरू आहे. दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे, तसा प्रयत्न सुरू आहे. चौकशी चालू आहे. कुणाची आणखी नावे आली तर त्यावरही कारवाई केली जाईल. पण कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. संबंध असेल तर कुणालाही पाठी घालणार नाही. ही माझी, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. माझ्यावर आरोप झाले, तेव्ही मी राजीनामा दिला होता. माझी गोष्ट वेगळी होती. माझ्या वेळी जी घटना घडली होती मला ते असह्य झालं, म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशी सुरू आहे. दोषींना पाठिशी घालणार नाही, कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील आरोपी सध्या कोठडीत आहेत. तसेच या घटनेतील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. या बरोबरच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
Ajit Pawar’s clean chit to Dhananjay Munde, will not resign
महत्वाच्या बातम्या