विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (EC) भेटण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने संतप्त नेत्यांनी आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या दिला.
मतदारयाद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह अतुल लोंढे, राजवी झा यांचा समावेश होता.
शिष्टमंडळातील सर्व नेते आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले असता, अधिकाऱ्यांनी सर्वांना भेट देण्यास नकार दिला. केवळ दोन नेत्यांना भेटणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, जोपर्यंत आमच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन आयोगाचे अधिकारी भेट घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून बाहेर पडणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत सर्वांनी एकत्रितपणे ठिय्या आंदोलन सुरू केले. भेट द्यायची असेल, केवळ दोघांना नाही, तर सर्वांनाच भेट द्या, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली.
महाराष्ट्रातील खऱ्या मतदारांना सन्मान मिळावा, मतदारयाद्यांमधून बोगस मतदार काढले जावेत, मतदारयाद्या शुद्ध कराव्यात आणि त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, यासाठी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटायला आलो होतो. पण त्यांना भेटल्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांवर ढकलतात. तर हे राज्यातील अधिकाऱ्यांवर ढकलत आहेत. यावरून निवडणूक आयोग दबावाखाली काम करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. निवडणुकांसाठी आमचीही तयारी आहे, परंतु, मतदारयाद्या शुद्ध करून निवडणुका घ्या, एवढीच आमची साधी मागणी होती. पण याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणताही सकारात्मक दृष्टीकोन घेतला नाही, असा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. आयोगाला कारवाई करायची नाही, असे दिसतंय – सावंत
आमच्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पळवाटा काढत होते. आयोगाकडून कोणताही सकारात्कम प्रतिसाद मिळाला नाही. मतदारयाद्यांमधील सगळा गदारोळ हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झाला. 73 लाख लोकांनी सायंकाळी पाचवाजेनंतर मतदान कसे केले? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाला विचारला. या संपूर्ण प्रकारासंदर्भात निवडणूक आयोग कोणती कारवाई करेल, असे वाटत नाही, अशी खंत देखील अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये नगरपालिका, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि जानेवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विरोधी पक्षांचा प्रमुख आक्षेप मतदार याद्यांमधील मोठ्या गोंधळावर आहे. लाखो मतदारांची नावे दुबार असणे किंवा याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असणे, यामुळे निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत आणि याच तक्रारीसाठी हे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले होते.
Central Election Commission denies meeting to Mahavikas Aghadi, MNS delegation, leaders sit in office
महत्वाच्या बातम्या
- पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली
 - चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन
 - पुणे पोलीस आयुक्तालयात तोतया आयपीएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
 - शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा
 
				
													


















