विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिलासा देणारी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, येत्या वर्षभरात मुंबई महानगर क्षेत्रात १५० किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग कार्यान्वित केला जाईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) सध्या विविध मेट्रो प्रकल्प राबवले जात आहेत. याच अनुषंगाने मेट्रो ७अ मार्गातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) ते अंधेरी पूर्व या भुयारी बोगद्याच्या १.६५ किमी लांबीच्या ‘ब्रेक थ्रू’चे यशस्वीपणे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक टप्प्याचे काम पूर्ण झाले.
कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, MMRDA चे आयुक्त संजय मुखर्जी व इतर अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर स्वत: बोगद्याच्या कामाची पाहणी केली.
हा बोगदा मेट्रो ७अ च्या डाउनलाइनवर असून, तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक ते एअरपोर्ट कॉलनी दरम्यान आहे. या मार्गामुळे मीरा-भाईंदर, वसई-विरार परिसर विमानतळाशी जोडला जाईल. तसेच ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे ५९% काम पूर्ण झाले आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून हा बोगदा एक चमत्कार आहे. खूप कठीण परिस्थितीतही हे काम पूर्ण झाले आणि त्यामुळे मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील वर्षापर्यंत १५० किमी मेट्रो मार्ग पूर्णत्वास नेला जाईल.”
शिक्षण धोरणात हिंदी सक्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “देशात एक संपर्कभाषा असावी, ही केंद्राची भूमिका आहे. मात्र महाराष्ट्रात मराठी सर्वांनी शिकलीच पाहिजे. त्याचबरोबर इंग्रजी, हिंदीसह इतर भाषाही विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत.”
MMRDA मार्फत सध्या एकूण ३३७.१० किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. वर्सोवा-घाटकोपर (मेट्रो १), दहीसर पूर्व-D.N. नगर (२अ), गुंदवली-दहिसर पूर्व (७) हे मार्ग नागरिकांच्या सेवेत आहेत. तसेच वडाळा-कासारवडवली (४), कासारवडवली-गाईमुख (४अ), ठाणे-भिवंडी-कल्याण (५), स्वामी समर्थ नगर-विक्रोळी (६), अंधेरी पूर्व-CSMIA T2 (७अ), दहीसर-मिरा भाईंदर (९) आणि कल्याण-तळोजा (१२) हे मार्ग प्रगतिपथावर आहेत.
या सर्व प्रकल्पांमुळे मुंबई व उपनगरांतील लाखो नागरिकांना प्रवासासाठी वेगवान, सुरक्षित आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार असून, मुंबईचा चेहरामोहराच बदलण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
Chief Minister Devendra Fadnavis gives relief to Mumbaikars, 150 km metro line will be completed by next year
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!