विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील मुंढवा येथील शासकीय भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एका समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना कथितपणे क्लीन चिट दिली आहे. यावर महाराष्ट्राचे प्रशासन रसातळाला गेल्याचे लक्षण असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. Vijay Kumbhar
समितीने मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य खरेदीदार शीतल तेजवानी व विक्रेते दिग्विजय पाटील यांच्यावर सदर भूखंड शासकीय असल्याची माहिती असतानाही ती खासगी मालमत्ता असल्याचे दाखवून विक्रीचा व्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. यामुळे पार्थ पवार यांची या प्रकरणातून अलगद सुटका झाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, मुंढवा प्रकरणात पार्थ पवारांना मिळालेली क्लीनचिट ही महाराष्ट्राचे प्रशासन रसातळाला गेल्याचे लक्षण असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ संचलाक असलेल्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाची 40 एकर जमीन खरेदी केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला होता. कंपनीच्या वतीने भागीदार दिग्विजय पाटील व कुलमुखत्यारपत्र धारक शीतल तेजवानी यांच्यात दस्त नोंदणीचा व्यवहार झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती स्थापन करम्यात आली होती. या समितीने मुद्रांक महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांना मंगळवारी आपला अहवाल सादर केला.
या अहवालात सरकारचा महसूल बुडवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, ही जमीन शासकीय असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, अमेडिया कंपनी व शीतल तेजवानी यांच्यात खरेदी विक्री झालेल्या व्यवहाराचा दस्त 700 हून अधिक पानांचा आहे. दस्तासोबत जोडलेल्या 7/12 वर मुंबई सरकार असे नमूद असून त्याला कंस आहे. त्यामुळे त्या जागेची मालकी ही सरकारची असल्याचे स्पष्ट होते. पण त्यानंतरही सातबारा बंद असातनाही तो दस्ताला जोडण्यात आला.
विशेषतः महार वतनाच्या जमीन व्यवहारात मुद्रांक शुल्कात माफी मिळवताना जिल्हा उद्योग केंद्राचे पात्रता प्रमाणपत्र जोडले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दस्त नोंदणीवेळी दिलेली मुद्रांक शुल्क माफी ग्राह्य ठरत नाही, असा निष्कर्षही चौकशी समितीने मांडला आहे. मुद्रांक शुल्क माफी घेऊन सरकारचा महसूल बुडवल्याचा ठपकाही चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. दस्त नोंदणी करताना तत्कालीन दुय्यम निबंधकांनी म्युटेशन (नावंत्रण) प्रक्रिया टाळण्यासाठी ‘स्किप’ हा पर्याय वापरला. त्यातून मिळकत जंगम (मूव्हेबल) असल्याचे भासवून नोंदणी पूर्ण केली.
सरकारी जमीन असतानाही मुद्रांक शुल्क माफी मिळवण्यासाठी इरादा पत्र जोडले. पण जिल्हा उद्योग केंद्राचे पात्रता प्रमाणपत्र मात्र जोडले नाही. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला.
एकूण 89 कुलमुखत्यारपत्रे दस्तासोबत जोडली गेली. यापैकी फक्त 34 नोंदणीकृत, उरलेली नोटरीकृत. 34 पैकी कोणत्याही पत्रात मोबदला (पैसा) देण्याचा उल्लेख नाही. तर 55 कुलमुखत्यारपत्रे विकास करारावर आधारित असून ती योग्य मुद्रांक शुल्क भरलेली नाहीत. पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अशोक गायकवाड व इतर 271 मालकांच्या वतीने शीतल तेजवानी यांना ही पत्रे दिली होती. दस्ताच्या अंतिम मसुद्यात बदल करून जमीन वैयक्तिक मालमत्ता असल्याचे दाखवण्यात आले.
मुठे समितीचा अहवाल एकटाच अंतिम नाही. जमाबंदी आयुक्तांची समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती हे प्रकरण तपासत असून त्यांचे अहवाल लवकरच सादर होणार आहेत.
पार्थ पवारांना देण्यात आलेली क्लीनचिट म्हणजे केवळ विनोद नाही, तर ते महाराष्ट्राचे प्रशासन रसातळाला गेल्याचे लक्षण आहे, अशी जोरदार टीका माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. प्रशासनाने राजकारणी व घराणेशाहीशी संगनमत केल्याचा आरोपही त्यांनी या प्रकरणी केला आहे. ते म्हणाले, मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे.
घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLP च्या ठरावावर त्यांची स्वतःची सही आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून LOI, करोडोंच्या स्टॅम्प ड्युटीतून सूट, रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया, प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला. आणि तरीही ते ‘निर्दोष’. ही चौकशी नाही. हे प्रशासनाने राजकारण्यांशी – घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे. कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर. त्यामुळे क्लिन चिट देणं म्हणजे त्या व्यवहारात थेट सहभागी असणं, असे कुंभार यांनी म्हटले आहे.
Clean chit to Parth Pawar is a sign that Maharashtra’s administration has gone into the abyss, criticizes Vijay Kumbhar
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















