विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकऱ्यांचे दु:ख पाहून राजकारण बाजूला ठेवा. कर्जमाफीसाठी चालढकल करणे म्हणजे त्यांच्या मृत्यूला निमंत्रण देणे आहे. ज्यांचा देशाच्या अन्नपुरवठ्यावर जीव आहे, त्या शेतकऱ्यांना वाचवा. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आवश्यक असल्यास ती रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. Uddhav Thackeray
महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडला आहे. अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि वाढती आर्थिक ओढाताण यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहेत. सरकारकडून मदतीच्या मोठमोठ्या घोषणा होत असल्या, तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर केले आहे. कर्जमाफीसाठी आणखी दीड वर्ष थांबावे म्हणजे शेतकरी जिवंत राहील का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे सरकारवर सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, निसर्ग कोपला आहे, आणि सरकार संवेदनाहीन झालं आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले. त्यांच्या मते, शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, जमिनीची धूप, जनावरांचे हाल आणि कर्जाचा वाढता बोजा, या सगळ्यांनी ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनवली आहे. या परिस्थितीत सरकारने ‘परदेशी समिती’ नेमून अभ्यास करणार असल्याचे सांगितले आहे, पण शेतकरी विचारतो की तोपर्यंत त्याच्या पोटात काय जाणार?
पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार असेल, तर शेतकऱ्यांनी आताचे हप्ते का भरावेत? आणि जर हे हप्ते न भरले तर रब्बीसाठी नव्याने कर्ज मिळणार का? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. त्यांच्या मते, सरकार शेतकऱ्यांना आश्वासनांच्या भूलथापांमध्ये गुंतवत आहे. शेतकऱ्यांचे दु:ख पाहून सरकारला काही फरक पडत नाही, कारण हा वर्ग मतांच्या गणितात वापरण्याची सोय झाली आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक संकटात सापडले आहेत. सलग सहा महिन्यांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतजमिनी ओल्या झाल्या आहेत, तर उभे पीक नष्ट झाले आहे. सरकारने नुकसानभरपाईसाठी हजारो कोटींच्या मदतीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज स्वतःच्या पोटाची भ्रांत करतो आहे. आणि तरीही सरकार अभ्यास अहवालाच्या प्रतीक्षेत आहे, हा मोठा विनोद आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे, आणि तरीही सरकारने जून 2026 पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे, ही संवेदनाहीनतेची परिसीमा आहे, असे ठाकरे म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, सरकार जर खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असेल, तर कर्जमाफीसाठी विलंब न करता तातडीने निर्णय घ्यावा. हे सरकार शेतकऱ्यांना झुलवत आहे. जूनचा गोड गुळ दाखवून कोपऱ्याला लावला आहे. पण यावेळी शेतकरी गप्प बसणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
Delaying Loan Waiver Is an Invitation to Farmers’ Deaths, Warns Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा
 
				 
													



















