विशेष प्रतिनिधी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 19 फेब्रुवारी 2025 रोजी 20,000 माय भारत स्वयंसेवकांसह “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा काढणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर राज्यमंत्री, खासदार आणि आमदार/महापालिका सदस्य देखील पदयात्रेत सामील होतील.
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विकसित भारताला कायम प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, शौर्य, धैर्य आणि चिरस्थायी वारशाचा गौरव केला जाणार आहे.
निसर्गरम्य वातावरणातून 4 किलोमीटर अंतरांची वाटचाल करणाऱ्या या पदयात्रेचा आरंभ पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातून होणार असून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. युवावर्ग, स्थानिक नेते आणि नागरिकांना एकत्र आणत, प्रथमच, संपूर्ण राज्यात सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी अशाच प्रकारच्या पदयात्रा काढण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पदयात्रेपूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती.