विशेष प्रतिनिधी
मुंबई : धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी सापडलेल्या तब्बल १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांच्या रोकड प्रकरणात राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी याबाबत घोषणा केली असून, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह यावर सविस्तर चर्चा झाली आहे.
सभापती राम शिंदे यांनी स्पष्ट केले की, “हा प्रकार अत्यंत गंभीर असून, विधिमंडळाच्या विश्वासार्हतेवर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. त्यामुळे याची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणे आवश्यक आहे.”
या चौकशीसाठी केवळ विधीमंडळातील सदस्यांवर आधारित नसून, निवृत्त न्यायाधीश, निवृत्त आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी समिती स्थापन करण्याचा विचार आहे. अशी समिती नेमण्याआधी लोकसभेत अशा प्रकरणांबाबत कशा तरतुदी असतात, त्याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य शासकीय कामासाठी धुळे जिल्ह्यात गेले असताना, विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आढळली. ही रोकड समितीच्या सदस्यांना लाच देण्यासाठीच नेण्यात आली होती, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
धुळे पोलिसांनी या प्रकरणी विश्रामगृहातील सर्व सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त केले असून, संपूर्ण तांत्रिक पुरावे, मोबाइल लोकेशन्स, आर्थिक व्यवहार यांचा तपास सुरू आहे. सूत्रांनुसार, रोकड कुणाच्या आदेशावर नेण्यात आली, ती कुणाच्या स्वाधीन करण्यात येणार होती, याचा तपासही सुरु आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील स्वतंत्र तपास समिती नेमण्याची घोषणा केली असून, त्याचबरोबर विधिमंडळाच्या अंतर्गत पातळीवरही एक समिती नेमली जाणार आहे. या ज्येष्ठ आमदारांच्या समितीचा उद्देश विधानमंडळाची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे आणि भविष्यकाळात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना सुचवणे असा असणार आहे.
सभापती शिंदे म्हणाले, “विधिमंडळाच्या समित्यांवरील विश्वास टिकवण्यासाठी या प्रकरणाची चौकशी संपूर्ण गांभीर्याने, निष्पक्षपणे आणि कायद्यानुसार केली जाणार आहे.”
Dhule cash case: Speaker Ram Shinde announces appointment of inquiry committee on the lines of Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित