विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह नाशिक आणि वसई-विरारमधून एका महत्वाची बातमी समोर आली आहे. या तिन्ही ठिकाणी ईडीने अचानक कारवाई करत छापे टाकले आहे. मुंबईसह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात वसई-विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरावर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे काल सोमवारीच त्यांनी वसई-विरार महापालिकेतील आयुक्त पदाचा कारभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या हाती सुपूर्द केला होता. त्या घटनेला काही तास उलटत नाही तर ही छापेमारी करण्यात आली आहे.
वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसई येथील दीनदयाल नगरमधील निवासस्थानी आज सकाळी साडे सात वाजता ईडीने छापेमारी केली आहे. डंपिंग ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल कुमार पवार यांनी कालच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली होती.
ईडीने यापूर्वी वसई-विरार शहरातील बिल्डर, आर्किटेक्ट आणि महानगरपालिकेचे अधिकारी वाय. एस. रेड्डी यांच्यावरही याच प्रकरणी छापे टाकले होते. सध्या ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. हे प्रकरण वसई, विरार, नालासोपारा पूर्वेकडील 41 अनधिकृत इमारतींशी संबंधित आहे, ज्या डंपिंग ग्राउंडवर बेकायदेशीरपणे बांधल्या गेल्या होत्या. या प्रकरणाची ईडीकडून सखोल चौकशी सुरू आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, वसई-विरार महापालिकेतील सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या घर आणि कार्यालय संबधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांसंर्भात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. या पूर्वीही ईडीने या प्रकरणात 13 ठिकाणी छापेमारी करून तब्बल 9 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता. परिणामी ईडीच्या या छापेमारीत आणखी काय नवी माहिती समोर येते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.