विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या माध्यमांनी घडवलेल्या चर्चांना स्वतः एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते घेतील, तो निर्णय आपल्याला वैयक्तिक पातळीवर आणि शिवसेना पक्ष म्हणून मान्य असल्याचा निर्वाळा एकनाथ शिंदे यांनी दिला.
गेल्या चार दिवसांपासून मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या विविध सूत्रांच्या आधारे चालविल्या होत्या. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागत असल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांना भाजपने केंद्रीय मंत्री पदाची त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, ती त्यांनी फेटाळून लावली अशा त्या बातम्या होत्या परंतु या सर्व बातम्यांना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.
एकनाथ शिंदे यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयामध्ये आपला आणि शिवसेना पक्षाचा कुठलाही अडसर नाही. आपण घ्याल तो निर्णय भाजपवर जसा बंधनकारक आहे, तसाच तो आमच्यावर महायुती म्हणून बंधनकारक आहे तो आम्ही मान्य करू, असे आपण मोदी आणि शाह यांना सांगितले, असा निर्वाळा एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीबद्दल एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.