विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : Ajit Pawar शक्ती प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही. माझा अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विशेषतः माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही, असे सांगत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे.Ajit Pawar
माणिकराव कोकाटे यांचा राज्य विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्या समर्थकांनी सिन्नर येथे मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याद्वारे शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस होता. पण माणिकराव कोकाटे यांनी आपला अजित पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत हा मेळावा रद्द करण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांच्या समर्थकांनी आजचा मेळावा रद्द केला.
कोकाटे म्हणाले, आपल्याला शक्ती प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही. माझा अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विशेषतः माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही. राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे खाते म्हणून माझ्या विभागाचे काम चालते. त्यामुळे मेळावा घेऊ नका.
दुसरीकडे, कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलून त्यांना वादग्रस्त वक्तव्य व व्हिडिओप्रकरणी शिक्षा दिली जाईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील सूत्रांनी केला आहे. कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा की त्यांचे खाते बदलावे याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता कोकाटे यांचाही राजीनामा घेतला तर पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर रोहित पवार व अन्य विरोधकांच्या दबावाला आपण बळी पडलो असा संदेशही त्यातून जाईल, अशी भीती व्यक्त करत आहेत.
माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी देशातील एकमेव साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनिमंदिरात जाऊन पूजाअर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांना यावरून टोला मारला आहे. तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे’, असं शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते… स्वार्थासाठी कोणत्याही मंत्र्याने शनिदेवाला कितीही तेलाचा अभिषेक केला तरी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कृषि विभागाला आणि मागासवर्गीय समाजाच्या समाजकल्याण विभागाला लागलेली पिडा आणि ती लावणारे या दोघांनाही दूर कर, अशी मी शनिमहाराजांना प्रार्थना करतो! असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे.