विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाची भेट दिली आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका झाला असून यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 1,700 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. वित्त विभागाने सोमवारी वाढीव महागाई भत्त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार राज्य सरकारने 1 जानेवारी 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढीव 2 टक्के महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकीत महागाई भत्त्यासह वाढीव भत्ता ऑगस्ट 2025 या महिन्याच्या वेतनासोबत रोखीने दिला जाणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ जवळपास 12 लाख कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. 12 लाख शासकीय पूर्णकालिक कर्मचाऱ्यांमध्ये शासकीय सेवेतील पाच लाख कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर मिळून सात लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचे वेतन गणपतीपूर्वी दिले जाण्याची शक्यता आहे. वित्त विभागाकडून तसे प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शासकीय सेवक, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार याशिवाय इतर योजनांच्या लाभार्थ्यांना प्रलंबित आणि चालू हप्ता गणेश चतुर्थीच्या सणापूर्वी अदा करण्याची मागणी केली आहे.
Ganeshotsav gift for government employees in the state! Two percent increase in dearness allowance
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला