विशेष प्रतिनिधी
नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेकडून रामकाल पथ प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीकाठावरील घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणि विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी शनिवारपासून पुढील दोन महिने म्हणजेच १६ जुलैपर्यंत रामकुंड आणि लगतच्या घाट परिसरात नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाविक, पुरोहित आणि स्थानिक नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. Kumbh Mela Nashik
रामकुंड परिसरात दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शन, स्नान, तर्पण, श्राद्ध, पिंडदान आणि अस्थि विसर्जनासाठी येत असतात. विशेषतः धार्मिक विधींसाठी या परिसराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मात्र घाट परिसरातील विकासकामांमुळे आता सर्व धार्मिक विधींसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. दशक्रिया विधी, त्रिपिंडी श्राद्ध आणि इतर पूजाविधी यशवंत महाराज पटांगण आणि भाजीपटांगण येथे उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या शेडमध्ये पार पडतील. तसेच स्नानासाठी गांधी तलाव आणि अस्थि विसर्जनासाठी स्वतंत्र अस्थिकुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर केला. घाट परिसर कशा पद्धतीने विकसित केला जाणार आहे, गर्दी व्यवस्थापन कसे होईल, तसेच भाविकांना कोणत्या सुविधा दिल्या जातील याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर पुरोहित संघाने तात्पुरत्या पर्यायी व्यवस्थेला सहमती दर्शविली असली तरी काही अतिरिक्त मागण्याही मांडल्या आहेत.
गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी सांगितले की, रामकुंड परिसरात २४ तासांत किमान एक लाख भाविक येत असतात. नदीकाठाचा परिसर विस्तीर्ण असल्याने गर्दीचा ताण जाणवत नाही. मात्र आता घाट बंद राहणार असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यांनी पूजाविधींसाठी कायमस्वरूपी इमारत उपलब्ध करून देण्याची तसेच काकस्पर्श विधीसाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याची मागणी केली.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात एकाचवेळी अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने नाशिककरांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. शहरातील प्रमुख मार्ग खोदण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळा तोंडावर असतानाही रस्ते दुरुस्तीची कामे मंदगतीने सुरू असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. घाट परिसर बंद झाल्याने धार्मिक पर्यटनावरही तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, कुंभमेळ्याच्या वेळी लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने घाट परिसर अधिक सुरक्षित, सुस्थितीत आणि आधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी ही कामे अत्यावश्यक आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, रामकुंड परिसरातील व्यापारी, फुलविक्रेते, पूजासाहित्य विक्रेते आणि लहान व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांच्या बंदीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था आणि भाविकांसाठी स्पष्ट सूचना फलक लावण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Kalaramkund area in Nashik shut for two months ahead of Kumbh Mela preparations
महत्वाच्या बातम्या